Tue, May 21, 2019 04:39होमपेज › Sangli › इनाम धामणीत पोलिसांचे छापे

इनाम धामणीत पोलिसांचे छापे

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:44PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील भूमी प्रॉपकॉर्न संस्थेत ठेवलेली दहा लाखांची ठेव परत न दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बुधवारी इनाम धामणीत छापे टाकले; मात्र पोलिसांची चाहूल लागताच संशयित मनोज कदम पसार झाला.  सन 2014 मध्ये दोन महिलांच्या नावे ठेवण्यात आलेले दहा लाख रुपये आतापर्यंत न दिल्याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कदम याच्याकडे सुशीला पाटील यांनी त्यांच्या व सुनेच्या नावावर ठेव ठेवण्यासाठी दहा लाख रुपये 2014 मध्ये दिले होते. त्यानंतर सलग सोळा महिने त्या ठेवीवरील व्याजही पाटील यांना मिळाले होते. 

एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी ठेव परत देण्याविषयी तगादा लावला होता; मात्र त्यावेळी कदम याने ‘तुम्ही आता व्याज घ्या, संस्थेची जमीन विकल्यानंतर ठेव परत देतो’ असे सांगितले होते; मात्र आजतागायत त्याने ठेवीची रक्‍कम परत दिली नाही. सतराव्या महिन्यापासूनचे व्याजही दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

त्यानंतर  पोलिसांनी इनाम धामणीत  छापे टाकले. कदम याच्या घरावरही छापा टाकण्यात आला. त्याशिवाय गावात अन्य ठिकाणाही त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो सापडला नाही. त्याला लवकरच अटक करू, असे पोलिसांनी सांगितले.