Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Sangli › पोलिस अधिकारी घालणार पायी गस्त

पोलिस अधिकारी घालणार पायी गस्त

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:23PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगलीकरांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी तसेच गुन्हेगारांना जरब बसावा, यासाठी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. आता त्यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना त्यांच्या हद्दीत पायी गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अधिकार्‍यांनी गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. 

त्यानुसार सर्व अधिकार्‍यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. अधिकार्‍यांच्या या गस्तीमुळे चोर्‍यांना आळा बसणार आहे. शिवाय, मारामार्‍या, हल्ले यासारख्या गुन्ह्यांवरही वचक ठेवता येणार आहे. त्यामुळे शर्मा यांनी राबविलेल्या नवीन योजनांचे सांगलीकरांमधून स्वागत केले जात आहे.

अधीक्षक शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व अधिकार्‍यांची गुन्हे आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याबरोबरच नागरिकांशी सुसंवाद साधण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या होत्या. कच्ची नोंद घेणे बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्यामुळे आता किरकोळ गुन्ह्यांचीही नोंद स्टेशन डायरीत केली जात आहे. 

अनिकेत कोथळे खूनप्रकरणानंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. ती सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधीक्षक शर्मा यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुख्यालयात नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता तक्रारी, फिर्याद, परवान्यांसाठी पोलिस ठाण्यांकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्याशिवाय त्यांनी आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना रोज सायंकाळी पायी गस्त घालण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.