Fri, May 24, 2019 20:50होमपेज › Sangli › वाळवा तालुक्यात पोलिसांच्या घरांची दुरवस्था

वाळवा तालुक्यात पोलिसांच्या घरांची दुरवस्था

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 19 2018 12:02AMइस्लामपूर : मारूती पाटील

वाळवा तालुक्यात सर्वच पोलिस ठाण्यांच्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे बहुसंख्य पोलिस  भाड्याच्या घरातच राहत आहेत.  तालुक्यात इस्लामपूर, आष्टा, कासेगाव, कुरळप अशी चार पोलिस ठाणी आहेत. त्यापैकी कासेगाव वगळता तीनही पोलिस ठाण्यांच्या पोलिस कर्मचारी वसाहतीची  दुरवस्था झाली आहे. कासेगाव पोलिस ठाण्याची तर अशी वसाहतच नाही.  पोलिस निवासस्थानांतील  जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे बहुसंख्य घरे  वापराविनाच पडून आहेत. 

इस्लामपूर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचार्‍यांची 90 पदे मंजूर आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी खासगी निवासस्थानात रहात आहेत. पोलिसांच्या निवासस्थानातील अनेक घरे पावसाळ्यात गळत आहेत. काही कर्मचार्‍यांनी प्लॅस्टिक कागद छतावर घालून तात्पुरता निवारा केला आहे. शौचालयांचीही दयनीय अवस्था झाली आहे.   अनेक घरातील वीज कनेक्शन थकबाकीअभावी तोडलेले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव काही पोलिसांना या निवासस्थानात वास्तव्य करावे लागते आहे.

प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत... 

पोलिस ठाण्याच्या उत्तरेला पोलिसांसाठी 46, तर अधिकार्‍यांसाठी 4 निवासस्थाने आहेत. ती  बांधून अनेक वर्षे झाली असल्याने त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. या 46पैकी बहुसंख्य निवासस्थाने वापराविना पडून आहेत. आधुनिक सुख-सुविधा राहिल्या परंतु आहे त्यातही कोणतीही   दुरुस्ती झालेली नाही. पोलिसांसाठी नव्या 30 निवासस्थानांचा प्रस्ताव  गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. 

आष्ट्यात केवळ 12 च निवासस्थाने...

आष्टा पोलिस ठाण्याचीही तीच अवस्था आहे. 1925 ची पोलिस कर्मचारी वसाहत आहे.  60 कर्मचार्‍यांची नियुक्‍ती असताना या ठिकाणी केवळ 12 च निवासस्थाने आहेत. तीही राहण्यायोग्य नाहीत. त्यामुळे कर्मचार्‍यांना भाड्याच्या घरात आसरा घ्यावा लागतो आहे. या पोलिस ठाण्यानेही घरकुलांचा नवा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. 

कुरळपमध्येही तीच अवस्था

कुरळप पोलिस ठाण्यात कर्मचार्‍यांची 34 पदे मंजूर आहेत. या ठिकाणी कर्मचार्‍यांसाठी 18 निवासस्थाने आहेत. मा, त्यातील एकही राहण्यायोग्य नाही. त्यामुळे या पोलिस ठाण्यातील कर्मचारीही इतरत्र राहतात. या पोलिस ठाण्यानेही दिलेला निवासस्थानाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. 

कासेगावमध्ये जागाच नाही...

कासेगाव पोलिस ठाणेच   भाड्याच्या इमारतीत  आहे. त्यामुळे निवासस्थानासाठीही जागा उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने  शासकीय जागा ताब्यात देण्यासाठी एनओसी न दिल्याने नव्या पोलिस ठाण्याची इमारत व निवासस्थानाचा प्रस्ताव रखडला आहे. या पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी इस्लामपूर व इतरत्र  राहतात.

प्रश्‍न जैसे थेच...

जिल्ह्याला आर.आर. पाटील व जयंत पाटील असे  दोन गृहमंत्री मिळाले. त्यांच्याही कारकिर्दीत पोलिस कर्मचार्‍यांच्या निवासाचा प्रश्‍न निकाली निघाला नाही. आता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पोलिस अधिकार्‍यांनी निवासस्थानासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. 

रक्षकच असुरक्षित...

जनतेची सुरक्षा करणार्‍या पोलिसांना स्वत: मात्र निवार्‍यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बदली झाली तरीही अनेक अधिकारी व कर्मचारी मुलांच्या शिक्षणामुळे इस्लामपूर शहरातच  राहतात. तालुक्यातील इतर पोलिस ठाण्याचे बहुसंख्य कर्मचारीही इस्लामपुरातच स्थायिक आहेत. वास्तविक पोलिसांना पोलिस ठाण्याच्या आसपासच राहणे बंधनकारक आहे. मात्र, निवासस्थानच उपलब्ध नसल्याने कर्मचार्‍यांना इतरत्र  रहावे लागते आहे.