होमपेज › Sangli › बदल्यांच्या दुकानदारीमुळे पोलिसांचे गुंडाराज फोफावले

बदल्यांच्या दुकानदारीमुळे पोलिसांचे गुंडाराज फोफावले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

लोकप्रतिनिधींनी पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची दुकानदारी मांडली आहे. यातूनच चांगले अधिकारी बाहेर आणि चुकीचे व भ्रष्ट अधिकारी मोक्याच्या जागी बसले आहेत. पोलिसांचे गुंडाराज फोफावले आहे, असा घणाघाती आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला. अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित मोर्चासमोर ते बोलत होते. सांगलीत अशाच कारभाराने घनवट, कामटेंसारख्या अधिकार्‍यांचे धाडस वाढल्याचा आरोप त्यांनी केला. 

ते म्हणाले, पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा गोरखधंदा उघड आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींचा मोठा सहभाग असतो. याला राजकीय पाठबळ असल्यानेच चुकीचे अधिकारी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्‍त केले जातात. चांगले अधिकारी मात्र बाजूला पडतात.

शेट्टी म्हणाले, मी गेली 15 वर्षे राजकारण करतो आहे, पण एकदाही चुकीच्या कामासाठी पोलिस ठाण्यात फोन केला नाही. माझे पोलिस ठाण्यांना क्वचितच फोन होतात. त्याचेही रेकॉर्ड तपासावे. पण काही लोकप्रतिनिधींनी  बदल्यांचा धंदा मांडला आहे. त्यातून मटका, जुगार, दारूवाल्यांच्या कामांसाठी अधिकार्‍यांच्या माध्यमातून पोलिस ठाणे म्हणजे लुटीचा अड्डाच बनविला आहे. अशाच कारभाराने सांगलीत घनवट, कामटेंसारख्या अधिकार्‍यांचे गुंडाराज फोफावले आहे. त्यांनी सामान्यांना न्याय देण्याऐवजी लुटण्याचा धंदा मांडला. यातून सुपार्‍या घेऊन खुनासारखे प्रकार घडले. ते म्हणाले, सांगलीत घडलेल्या प्रकाराने राज्याची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे आता पोलिस दलाचे शुद्धीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी  प्रथम लोकप्रतिनिधींनी मांडलेला बदल्यांचा धंदा बंद पाडावा. अन्यथा त्यांचेही यात हात बरबटले आहेत, असे नाईजालाजाने म्हणावे लागेल.

म्हणूनच मोर्चाकडे सांगलीतील लोकप्रतिनधींची पाठ

शेट्टी म्हणाले,  अनिकेत कोथळेच्या खूनप्रकरणामुळे संपूर्ण समाज पेटून उठला आहे.  त्यामुळे आज होणार्‍या मोर्चासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहणे त्यांचे कर्तव्यच होते. परंतु त्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली आहे.  त्यांचे या अधिकारी, पोलिसांशी लागेबांधे आहे का? त्यांच्याकडून हप्ते घेत असल्याने  ते मोर्चाकडे फिरकले नाहीत का?