Tue, Jan 21, 2020 10:41होमपेज › Sangli › स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीची नोटीस 

स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीची नोटीस 

Last Updated: Oct 09 2019 8:27PM
इस्लामपूर : शहर वार्ताहर

महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या भिरकवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. खराडे, जाधव यांना सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दोघांकडे लेखी, तोंडी खुलासा मागितला आहे.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पलूस तालुक्यातील दह्यारी फाट्यावर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ, कोंबड्या, अंडी भिरकावली होती. यामुळे पोलिस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. या प्रकरणात खराडे, जाधव यांना अटक करण्यात आली होती. दोघांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शांतता भंग करणे, दहशत माजविणे, लोकांच्या भावना भडकविणे आदी गुन्हे तासगाव, कुंडल,सांगली, आष्टा, इस्लामपूर, चिंचणी -वांगी या पोलीस ठाण्यात नोंद आहेत.

पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी खराडे यांना तर इस्लामपूरचे पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी जाधव यांना नोटीस बजावली आहे. त्यांना हद्दपार का करू नये याचा लेखी, तोंडी खुलासा त्यांच्याकडे पोलिसांनी मागितला आहे.