Tue, Mar 19, 2019 05:28होमपेज › Sangli › म्हैसाळची जुनी थकबाकी माफ करावी

म्हैसाळची जुनी थकबाकी माफ करावी

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 11 2018 8:20PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

म्हैसाळ योजनेची जुनी थकबाकी माफ करावी,  अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून पाणीपट्टीचे 36 कोटी रुपये माफ करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे  प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले.

खासदार पाटील म्हणाले, म्हैसाळ योजना सुरू व्हावी, अशी शेतकर्‍यांची इच्छा आहे. मात्र जुन्या पाणीपट्टीच्या थकीत रकमेचा मोठा प्रश्‍न आहे. तो सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे घालू. राज्य शासनाने या योजना कायम चालू राहाव्यात यासाठी वीजबिलाचा 81:19 चा फार्म्युला तयार केला आहे. त्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार शेतकरी भविष्यात पाणीपट्टी भरतील. यामध्ये जुन्या थकबाकीचा मुद्दा शेतकर्‍यांनी मांडला. त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. डोक्यावर लादलेला हा बोजा कमी करावा. नव्याने योजना सुरू करण्यासाठी पर्याय काढावा, अशी मागणी  आहे.

राज्य शासनाने जिल्ह्यातील सिंचन योजनांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेमध्ये तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांना लाभ होणार आहे.एवढी मोठी रक्कम आजपर्यंत कधीही मिळाली नव्हती, मात्र प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून मंजूर असलेल्या निधीतून कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: सकारात्मक भूमिकेत आहेत. दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी दीपक शिंदे, गोपाळराजे पटवर्धन, चंद्रकांत हाके, अनिल शिंदे, हायूम सावनूरकर, जनार्दन पाटील, दादासाहेब कोळेकर, तानाजी पाटील, विजयराव कुलकर्णी, अनिल लोंढे, अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब पाटील, महादेव सूर्यवंशी, मिलिंद कोरे, रमेश साबळे, नंदकुमार घाडगे, रणजित घाडगे, पिंटू पाटील उपस्थित होते.