सांगली : प्रतिनिधी
प्लास्टिक बंदीअंतर्गत महा-पालिकेच्यावतीने शनिवारपासून (दि. 23) सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये प्लास्टिक जप्तीमोहीम सुरू करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे प्लास्टिकचा वापर, विक्री आढळून आल्यास संबंधितांना पाच ते 25 हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याचे आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपायुक्त सुनील पवार यांनी सांगितले. प्रसंगी यासंदर्भात फौजदारी कारवाईही करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
पवार म्हणाले, प्लास्टिकचे प्रदूषण ही मोठी डोकेदुखी आहे. देशभरात या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच नागरी आरोग्यालाही धोका होत आहे. त्याचे विघटन होत नाही. यामुळे कचर्याच्या समस्येत हा मोठा गंभीर प्रश्न आहे. याचा विचार करून राज्यात गुढीपाडव्यापासूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. परंतु पूर्वीचा साठा असल्या कारणाने विक्रेत्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे न्यायालयाने साठा संपविण्यासाठी तीन महिने सूट देण्यात आली. याची मुदत शनिवारी (23 जून) संपते आहे.
ते म्हणाले, या धर्तीवर आता प्लास्टिकबंदीसाठी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता आरोग्य विभागामार्फत प्लास्टिकजप्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. पवार म्हणाले, प्लास्टिक, थर्माकॉल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, हाताळणी व साठा यावर पूर्णतः बंदी आहे. त्यानुसार तीनही शहरात शहरात प्लास्टिक, थर्माकॉल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी यांना मज्जाव आहे. यामुळे निव्वळ जप्ती नव्हे तर प्लास्टिक बाळगणार्यांनाही 5 हजार ते 25 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल.
ते म्हणाले, यात सर्व व्यक्ती, व्यक्तींचा समूह, शासकीय व अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडासंकुल, क्लब, चित्रपटगृह व नाट्यगृह, औद्योगिक घटक, धार्मिक स्थळे, धार्मिक संस्था, किरकोळ विक्रेते, घाऊक व्यापारी, वाहतूकदार, सेल्समन, मंडई, स्टॉल्स, पर्यटन क्षेत्रे, सागरी किनारे, सार्वजनिक ठिकाणे, वाणिज्य संस्था, दुकानदार, भाजी विक्रेते, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल्स, मंगल कार्यालये, अन्य व्यवसायिक, नागरिक आदिंचा समावेश आहे. पवार म्हणाले, प्लास्टिकला डिस्पोजेबल कागदी पिशव्या, कापडी पिशव्यांचे पर्याय दिले आहेत. बचतगटांच्या
माध्यमातून पालिकेने प्रयत्न केले आहेत. त्याला प्रतिसाद मिळत आहे.
बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू
सर्व प्रकारचे प्लास्टिक, थर्माकॉलपासून बनवल्या जाणार्या व एकदाच वापरातील वस्तू. उदा. पिशव्या, ताट, प्लेट, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे आदी. हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकिंगसाठी वापरल्या जाणारी भांडी, वाटी, स्ट्रॉ, नॉन वोचन, पॉलिप्रालीलेन बॅग्ज, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नदपदार्थ धान्ये आदी साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक वेस्टन.
या प्लास्टिक वस्तूंना आहे सवलत
प्लास्टिकबंदी करताना औषधे, फलोत्पादन, कृषीउद्योग आदींना मात्र यात सवलत देण्यात आली आहे. औषधाच्या वेस्टनाचेे प्लास्टिक, वन व फलोत्पादने साठविण्यासाठी, कृषी, घनकचरा हाताळणी, रोपवाटिकामध्ये वापरण्यात येणार्या कंपोझिबल प्लाटिक पिशव्या किंवा प्लास्टिक पिशवीची उत्पादने. उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान अनिवार्य वेस्टनासाठी लागणारे प्लास्टिक आवरण किंवा पिशवी, दुधाच्या पॅकेजिंगसाठी लागणारे प्लास्टिक.
शिल्लकसाठी येथे जमा करावा
पवार म्हणाले, गुढीपाडव्यापासून प्लास्टिकमुक्तीसाठी विक्रेत्यांकडे असलेला स्टॉक जेथे परवानगी आहे अशा राज्यात विक्रीसाठी पाठविण्याची मुभा दिली होती. त्यामुळे 23 तारखेनंतर कोणतेही कारण ऐकले जाणार नाही. तरीही शिल्लक साठा विक्रेत्यांनी आजपर्यंत सांगलीत शिवाजी स्टेडियम,डास प्रतिबंधक केंद्र, मिरजेत मनपा विभागीय कार्यालय,आरोग्य विभाग, कुपवाडमध्ये मनपा कार्यालय,आरोग्य विभाग येथे जमा करावा.
पर्यायाशिवाय कारवाई नको : समीर शहा
व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, प्लास्टिकबंदी योग्यच आहे. परंतु अन्न-धान्य, सर्व वस्तूंचे पॅकिंग हे प्लास्टिकमधूनच असते. त्याला पर्याय काय देणार? नव्या वस्तू विक्रीपूर्वी हाताळल्यास ते ग्राहक घेत नाहीत. त्यामुळे कारवाई करण्यापूर्वी सक्षम पर्यायही हवा. प्लास्टिक व्यावसायिक रवी खत्री म्हणाले, प्लास्टिक बंदी ठीक आहे. परंतु त्याला सक्षम पर्याय अद्यापही नाही. कारवाईचा बडगा फक्त दंड वसुलीसाठी ठरणार आहे.