Mon, Jun 17, 2019 19:02होमपेज › Sangli › तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्ष लागवड करा : खोत

तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्ष लागवड करा : खोत

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 8:57PMसांगली : प्रतिनिधी

तापमानवाढ रोखण्यासाठी   आणि पर्यावरण संतूलन राखण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही, असे प्रतिपादन  कृषि, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर (भोसे) येथे  13 कोटी वृक्षलागवड   कार्यक्रम शुभारंभ मोहिमेत  ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी विजयकुमार  काळम- पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारतसिंह हाडा, सह्याद्रि व्याघ्र प्रकल्प (राखीव) च्या उपसंचालिका डॉ. विनिता व्यास, विभागीय वन अधिकारी विश्वास जवळेकर आदी उपस्थित होते.

मंत्री खोत म्हणाले,   शेतकर्‍यांना त्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यासाठी विविध फळझाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शासकीय यंत्रणांच्या जोडीला हजारो हात वृक्षलागवडीसाठी पुढे आले आहेत. त्यातून ही लोकचळवळ बनली आहे. या मोहिमेतून संपूर्ण मानवजातीला वृक्षलागवडीच्या कर्तव्याचा संदेश दिला गेला. केवळ वृक्षलागवड करून न थांबता वृक्षसंगोपन ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

खासदार  पाटील म्हणाले, सन 2017 ते 19 या कालावधीत संपूर्ण राज्यात 50 कोटी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले,  जिल्ह्यास  29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या 43 रोपवाटिकेमध्ये 45 लाख रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी 29 लाख 17 हजार रोपांची  लागवड करण्यात येणार आहेत. 

यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा देण्यात आली.  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, भूजल सर्वेक्षणचे दिवाकर धोटे, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, मिरजचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, मिरजचे तहसीलदार शरद पाटील, मिरज पंचायत समितीचे आणि भोसे व खरशिंग ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.