Wed, Jul 17, 2019 20:19होमपेज › Sangli › चांदोली विकासासाठी  आराखडा : जिल्हाधिकारी

चांदोली विकासासाठी  आराखडा : जिल्हाधिकारी

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 30 2018 11:29PMवारणावती : वार्ताहर  

चांदोली अभयारण्याच्या पर्यटन विकासासाठी कालबद्ध  कार्यक्रम आखून नियोजन करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी केले. येथे चांदोली पर्यटन विकासासंदर्भात मंगळवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, कार्यकारी अभियंता किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका विनिता व्यास, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दीपक शिंदे,गटविकास अधिकारी अनिल बागल आदि अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी पाटील  म्हणाले,  पर्यटनाच्या नकाशावर जिल्हा आणायचा असेल तर सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. नियोजनबद्ध आराखडा करुन चांदोलीच्या विकासासाठी प्रयत्न करुया. पर्यटकांसाठी सुसज्ज विश्रामगृह, अभ्यागत कक्ष,वाहन व्यवस्था, निरीक्षण मनोरे, सुविधा केंद्र आणि सौजन्यपूर्ण वागणूक या मुद्यांना प्राधान्य देऊन संबधित विभागाच्या अधिकार्‍यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी  दिल्या. 

प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांकडून चांदोली पर्यटन विकासासंदर्भात  काय करू शकता याची माहिती घेतली.एप्रिल महिन्यात पुन्हा बैठक घेऊन किती अंमलबजावणी झाली याचा आढावा घेऊ असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.    

 आमदार  नाईक म्हणाले, सोईसुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. यासाठी वेगवेगळ्या विभागांना कालबध्द कार्यक्रम द्या. चंद्रपूरला पर्यटनावर प्रचंड खर्च होतो;  मात्र चांदोलीबाबत तसे होत नाही.  आ. नाईक यांनी रत्नागिरीप्रमाणे मत्स्यालय ,सर्पोद्यान, बागबगीचा, आकर्षक कारंजे यामुळे  पर्यटन विकासाला चालना देता येईल. पर्यायाने स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी संकल्पना मांडली.  जिल्हाधिकारी पाटील व आमदार नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन झाले.