Thu, Feb 21, 2019 05:00होमपेज › Sangli › इस्लामपुरात मुलावर डुकरांचा हल्‍ला

इस्लामपुरात मुलावर डुकरांचा हल्‍ला

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:49PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

येथील राजेबागेश्‍वर परिसरात सात वर्षांच्या मुलावर डुकरांनी हल्‍ला केला. मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. हृतिक रमेश राठोड असे  त्याचे नाव आहे. 

हृतिक दुपारी चारच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. तेथे डुकरांचा कळप आला. त्यातील एका गलेलठ्ठ डुकराने त्याच्यावर हल्‍ला चढवला. डुकराने त्याच्या पायाला, मानेला चावा घेतला. त्याच्या ओरडण्याने लोक तेथे आले. लोकांनी डुकरांच्या कळपाला हुसकावून लावले.  अचानक झालेल्या या हल्ल्याने  हृतिक हबकून गेला होता. त्याच्या मानेला दोन टाके, पायाला  चार टाके पडले आहेत. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. 

शहरात मोकाट कुत्री, डुकरे, गाढवांनी उच्छाद मांडला आहे. ही जनावरे झुंडीने, कळपाने  फिरत आहेत. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांच्या झुंडी दुचाकी चालकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रकारही घडत आहेत. डुकरे पकडण्याची मोहीम पालिकेने थांबविल्याने शहरात डुकरांची संख्या वाढली आहे. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीच हालचाल न झाल्याने राजेबागेश्‍वर येथील हल्ल्याचा प्रकार घडला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.