Mon, Sep 24, 2018 07:11होमपेज › Sangli › सहा महिन्यांच्या बाळाला दिले सळईने चटके

सहा महिन्यांच्या बाळाला दिले सळईने चटके

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 24 2018 12:17AMतासगाव : शहर प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी शंभर रुपये दिले नाहीत म्हणून पत्नीवरील रागाने बापाने स्वतःच्या सहा महिन्यांच्या मुलाला  सळईने चटके दिल्याचा गंभीर प्रकार घडला. येथील बेंद्री रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनीत हा प्रकार घडला.याप्रकरणी सौ. मनीषा अतुल मुळीक (वय 25, रा. लक्ष्मी कॉलनी, तासगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा पती अतुल हणमंत मुळीक याच्याविरुद्ध सोमवारी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अतुलला दारूचे व्यसन आहे. त्याला दोन मुले आहेत. अरिहंत हा दोन वर्षांचा आहे, तर एक सहा महिन्यांचा मुलगा आहे. दारू पिण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत. रविवारी अतुल कामाला गेला नव्हता. सायंकाळी साडेसहा वाजता तो बाहेरून घरात आला. पत्नी मनीषा हिच्याकडे दारू पिण्यासाठी शंभर रुपये मागू लागला. मनीषा यांनी ‘घरखर्चाला पैसे कमी पडतात’, असे सांगून पैसे देण्यास नकार दिला. ‘तू पैसे कसे देत नाही, बघतोच’, असे म्हणून अतुलने एक सळी चुलीमध्ये विस्तवात ठेवली; मात्र मनीषा यांनी तिकडे दुर्लक्ष केले. त्या स्वयंपाक करू लागल्या. पाच मिनिटांनंतर त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलाचा रडल्याचा आवाज आल्याने त्या बाहेरील खोलीत गेल्या. त्यावेळी अतुलने त्या बाळाच्या डाव्या पायावर तापलेली सळई ठेवली होती.मनीषा यांनी त्वरित ती सळई बाजूला ठेवली व अतुलला बाजूला ढकलून दिले. शेजारच्यांंनी अतुलला घरातून बाहेर नेले. बाळाच्या पायाला दोन ठिकाणी फोड येऊन मोठी जखम झाली होती. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास हवालदार मुळे करीत आहेत.