होमपेज › Sangli › स्थायी, स्वीकृत सदस्य निवडी 5 सप्टेंबरला

स्थायी, स्वीकृत सदस्य निवडी 5 सप्टेंबरला

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:19AMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडी नुकत्याच पार पडल्या. आता सर्वांचे लक्ष स्थायी समिती सदस्य आणि स्वीकृत नगरसेवकपदांकडे  लागले आहे. यासाठी दि. 5 सप्टेंबरला महासभा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये स्थायी समितीच्या 16 सदस्यांची व स्वीकृत 5 सदस्यांची निवड होणार आहे. यासाठी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

महापालिकेचे अर्थखाते म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थायी समितीच्या सदस्यांतून सभापतींची निवड होणार आहे. समितीत भाजपला 9, काँग्रेस 4 व राष्ट्रवादीला 3  सदस्यपदे मिळणार आहेत. तीनही पक्षांकडून सदस्यांना प्रभागनिहाय संधी दिली जाणार आहे. 

सदस्यपदासाठी भाजपकडून अजिंक्य पाटील, भारती दिगडे,  पांडुरंग कोरे, संजय कुलकर्णी, शिवाजी दुर्वे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्या फेरीत संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही भाजपला अडचणीत आणण्यासाठी अनुभवी सदस्यांना चाल देण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपकडून 100 कोटींच्या निधीच्या खर्चाला गती देण्यासाठीही स्थायीत एंट्रीसाठी रस्सीखेच सुरू आहे. 

सभागृहात नसलेले पण तीनही पक्षांसाठी राबणारे, अनुभवी अशा सदस्यांना सभागृहात स्वीकृत सदस्य म्हणून  एंट्री करावी,  असे वाटते आहे. यामध्ये भाजपला तीन, तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एकेक जागा मिळणार आहे. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील भाजपची सर्व सूत्रे माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्याकडे सोपविल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांना स्वीकृत म्हणून प्रवेश निश्‍चित मानला जातो. उर्वरित  एक जागा सांगली व एक जागा मिरजेला मिळण्याची शक्यता आहे. सांगलीत मुन्ना कुरणे, शरद नलावडे, केदार खाडिलकर यांच्यासह अनेक नावे चर्चेत आहेत. 

काँग्रेस व राष्ट्रवादीतून प्रत्येकी एका स्वीकृत नगरसेवक होणार आहे. काँग्रेसकडून दिलीप पाटील, मयूर पाटील, करीम मेस्त्री, कय्यूम पटवेगार   इच्छुक आहेत. पक्षात तीन गट असल्याने  कोणाला संधी द्यायची यासाठी खल सुरू आहे. 

राष्ट्रवादीतही जमीर बागवान, प्रा. पद्माकर जगदाळे, प्रसाद मदभावीकर, संजय बजाज अशी नावे चर्चेत आहेत. परंतु विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी जुन्या किंवा पराभूत उमेदवारांना संधी न देता प्रत्येकी एक वर्ष अशा पाच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असा आग्रह धरला आहे. त्या निकषानुसार किमान चारजणांना संधी देण्याचा विचार पुढे आला आहे. 

निवडणुकीतील आश्‍वासने; आता संधी द्या

महापालिका निवडणुकीवेळी सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी उफाळून आली होती. त्यावेळी नेत्यांनी अर्ज माघारीवेळी बंडखोरांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देेतो, असा शब्द दिला होता. त्यामुळे काहींनी अर्ज मागे घेतले; काहींनी नेत्यांच्या शब्दाखातर अर्जच भरला नव्हता. त्यामुळे आता  त्यांनी नेत्यांना शब्दाची आठवण देत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मिरजेतून जमीर बागवान यांना शब्द दिला होता. राष्ट्रवादी बैठकीत त्याला दुजोराही दिला होता. त्यामुळे  बागवान आता आग्रही आहेत. काँग्रेसचे विश्‍वजित कदम, जयश्री पाटील यांनीही काहीजणांना  आश्‍वासन दिले होते. भाजपच्या नेत्यांनी काहींना शब्द दिल्याचा दावा केला जात आहे.  त्यामुळे त्यांचीही इच्छुक कार्यकर्त्यांना संधी देताना कसोटी लागणार आहे.