होमपेज › Sangli › वाळवा तालुक्यात पाझर तलाव कोरडेच 

वाळवा तालुक्यात पाझर तलाव कोरडेच 

Published On: Aug 31 2018 1:42AM | Last Updated: Aug 31 2018 12:24AMइस्लामपूर : मारूती पाटील

ऑगस्ट महिना संपला तरीही वाळवा तालुक्यात पुरेसा पाऊस  झालेला नाही. त्यामुळे  बहुसंख्य पाझर तलाव कोरडेच आहेत. काही तलावात नाममात्र पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत केवळ 254 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांना  परतीच्या पावसाची  प्रतीक्षा आहे. 

जूनच्या अखेरीस तालुक्यात पावसाला सुरूवात झाली. तालुक्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर आहे. मात्र, पूर्व भागात पावसाने ओढ दिली आहे. पश्‍चिम भागातील रेठरेधरण, सुरूल, कार्वे येथील मोठे तलाव भरले आहेत. इतर 27 पैकी काही तलावात 50 ते 60 टक्केच पाणीसाठा आहे. तर अनेक तलाव ऐन पावसाळ्यातही कोरडे ठणठणीत आहेत.  विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढलेली नाही. 

हुकमी पावसाचे तीन महिने संपत आले तरीही सरासरीच्या निम्माही पाऊस तालुक्यात झालेला नाही. तालुक्यात सरासरी 800 ते 850 मिलीमीटर पाऊस पडतो. गतवर्षी 649 मिलीमीटर पाऊस झाला होता. अर्थात परतीच्या पावसानेच गतवर्षी पाझर तलाव भरले होते. 

आत्तापर्यंतचा मंडलनिहाय  पाऊस ( मिलीमीटर) असा ः पेठ-277 , कुरळप- 408 , इस्लामपूर- 254, वाळवा-193, आष्टा- 236, ताकारी- 465 , कासेगाव- 289, तांदूळवाडी- 531 , कामेरी- 217, बहे- 318, कोरेगाव- 386. तांदुळवाडी मंडलमध्ये सर्वाधिक तर वाळवा मंडलमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे.