Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Sangli › चोरट्याला पाठलाग करून पकडले, अन् पोलिसांनी सोडले

चोरट्याला पाठलाग करून पकडले, अन् पोलिसांनी सोडले

Published On: Apr 25 2018 7:55AM | Last Updated: Apr 25 2018 7:55AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बॅग चोरी करणार्‍या एका युवकाला पाठलाग करून नागरिकांनी पकडले. त्याला बेदम चोप देऊन शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

त्याच्याकडे बेशुद्ध करण्याचा स्प्रेही सापडला. मात्र कोणाचीही तक्रार नसल्याचे सांगत शहर पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्याला सोडून दिले. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. 

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक प्रवासी बसस्थानकावर थांबला होता. त्यावेळी दोन तरूणांनी त्याची बॅग कापून पळवून नेली. प्रवाशाने आरडाओरडा केल्यानंतर तेथील काही युवकांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर दीनानाथ चौकात एका चोरट्याला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे बेशुद्ध करण्याचा स्प्रेही सापडला. त्यामुळे जमावाने त्याला बेदम चोप दिला. 

त्यानंतर चोरट्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र त्याच्याविरोधात कोणाचीही तक्रार नसल्याने त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला रात्रीच सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके म्हणाले, तो युवक जयसिंगपूर येथील एका महाविद्यालयातील होता. त्याला संशयावरून पकडण्यात आले होते. त्याच्याजवळ सापडलेला स्प्रे दुसर्‍या युवकाचा असण्याचा संशय होता. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले.