होमपेज › Sangli › पाण्यासाठी नगरसेवक, अधिकार्‍यांना घेरले

पाण्यासाठी नगरसेवक, अधिकार्‍यांना घेरले

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

येथील कोल्हापूर रस्त्यावर भारतनगरमध्ये पाणीटंचाईमुळे नगरसेवक बाळासाहेब गोंधळे यांना नागरिकांनी घेरले. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचा त्यांना फटका सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी पुन्हा नागरिकांसह पाणीपुरवठा विभागात जावून अधिकार्‍यांना घेरले.  दोन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्‍त केला. पाणीपुरवठा सुरळित न झाला तर पाणी बिले भरण्यावर आणि निवडणुकीवरही बहिष्कार घालू, असा इशारा नागरिकांनी दिला.

येथील कोल्हापूर रस्त्यावर भारतनगर, रामनगर, आकाशवाणी कॉलनी, रुक्मिणीनगर, शामरावनगरातील अनेक उपनगरांमध्ये वारंवार पाण्याचा ठणठणाट असतो. यामुळे नागरिकांकडून यासाठी पाठपुरावा सुरू असतो. यासाठी येथील आकाशवाणीच्या पिछाडीस सुभाषनगर येथे पाणीटाकीही उभारण्यात आली आहे. ती कार्यान्वितही झाली आहे. परंतु पाण्याचे पूर्ण क्षमतेने नियोजन नाही. येथील मध्यवर्ती हिराबाग वॉटरवर्क्सपासून हा परिसर जवळ असूनही पाणीप्रश्‍न सुटलेला नाही. 

यामुळे नागरिकांनी अनेकवेळा पाण्यासाठी मोर्चे काढले, हिराबाग वॉटरवर्क्सवर तोडफोड आंदोलनही करण्यात आले. त्यानुसार तात्पुरता तोडगाही काढण्यात आला. पण पुन्हा जैसे थे परिस्थिती होती. गेल्यावर्षी अधिकार्‍यांना कोंडून घातल्यानंतर पाणीपुरवठा करणारे वॉल्व्हच गायब असल्याचे समोर आले होते. ते दुरुस्त करून यंत्रणा सुुरळित करण्याचा निर्णय झाला. पण ते कामही पूर्ण झाले नाही. 
दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे येथील भारतनगरातील नागरिक मंगळवारी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. 

त्यांनी नगरसेवक श्री. गोंधळे यांना पाचारण केले. ते भागात येताच नागरिकांनी त्यांना घेराओ घालून आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यांनी तत्काळ नागरिकांसह पाणीपुरवठा विभागात जावून कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये यांना धारेवर धरले. 

याबाबत गोंधळे म्हणाले, गेल्या आठवड्याभरापासून पाणी नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. यासंदर्भात अधिकारी श्री. कुंभार यांना बजावून सांगितले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्षच केले. याचाच हा परिणाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सुभाषनगर येथील टाकीतून टप्प्या-टप्प्याने भारतनगरपर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकतो. पण पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार सुरू आहे. यावेळी नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. तातडीने पाणी मिळाले नाही. तर पाणीबिले भरणार नाही, असा पवित्रा घेतला. सोबतचच महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालू, निवडणुकीमध्ये याभागात प्रचारासाठी कोणालाही फिरू देणार नाही, असाही इशारा दिला.  यावरून गोंधळेही संतप्त झाले. ते म्हणाले. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे आम्हाला रोष सहन करावा लागत आहे.