Sat, Jul 20, 2019 23:33होमपेज › Sangli › मिरज रेल्वेस्थानकात पादचारी पूल काम रखडले

मिरज रेल्वेस्थानकात पादचारी पूल काम रखडले

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 11:34PMमिरज : जे. ए. पाटील

रेल्वेस्थानकात उत्तर बाजूकडे नवीन पादचारी पूल उभारणीचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परंतु सध्या या कामात शिथीलता आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काम बंद आहे. सध्याचा पादचारी पूल  सुमारे 65 वर्षापूर्वीचा  आहे. सध्या तो प्लॅटफार्म क्र. 5 व 6 वर जाण्याकरिता बंद करण्यात आला आहे. तो रुंदीने कमी असली तरी  ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असते. स्थानकाच्या दक्षिण बाजूकडे नवा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. परंतु त्याची उंची जास्त असल्याने प्रवासी त्याचा वापर कमी  करतात. जुना  पूल मोडकळीस आल्याने तिथे  लिफ्टच्या सुविधेसह सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चाचा नवा पूल मंजूर  आहे. या पुलाच्या उभारणीकरीता प्लॅटफार्म क्रमांक 1, 2, 3-4 व 5-6 वर काँक्रीटचे काम पूर्ण केले आहे. लोखंडी खांब उभे करुन त्यावर पूल उभारणीचे काम मात्र रखडले आहे.

नव्या पुलाला लिफ्ट बसविण्यात येणार आहे.  रेल प्रबंधकांच्या तपासणीमध्ये काही बदल सुचविण्यात आले आहेत. स्थानकात रेल्वे मार्गाचेही विद्युतीकरण होणार आहे. त्यामुळे नवीन सुचनांसह बदल होणार असल्याने पुढील काम सध्या बंद असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र जुलैअखेर  ते काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये पादचारी पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग येते. आणि प्रलंबीत कामांना गती मिळते.  येथेही नवीन पादचारी पुलाला गती देण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकात कोट्यवधी रुपये खर्चाची सुशोभीकरणाची कामे झाली आहेत.  मात्र दुसरीकडे नवीन पादचारी पुलाचे काम मात्र रखडले आहे.मिरज-कोल्हापूर, बेळगाव, पंढरपूर रेल्वे मार्गावर रस्ते वाहतुकीसाठी पूल आहे. परंतु तोही कालबाह्य झाला आहे. ठिकठिकाणी  तडे गेले आहेत. त्यामुळे तिथेही नवा पूल उभारण्याची गरज आहे.

स्कॅनिंग मशिन : असून अडचण, नसून खोळंबा

रेल्वे स्थानकात येणार्‍या, जाणार्‍या प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्याकरिता प्रवेशद्वारावर आरपीएफच्या नियंत्रणाखाली स्कॅनिंग मशिन बसविण्यात आले आहे. परंतु ते गेले महिनाभर बंद आहे. आजअखेर या स्कॅनिंग मशिनमध्ये कोणा प्रवाशाकडे आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेली नाही. मात्र  आता हे स्कॅनिंग मशीन म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ बनले आहे. मशीन बंद असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु  ते  दुरुस्त करण्यात आलेले नाही.