Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Sangli › ‘वसंतदादा’च्या कराराबाबत पवारांकडून आश्‍चर्य 

‘वसंतदादा’च्या कराराबाबत पवारांकडून आश्‍चर्य 

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 10:37PMसांगली : प्रतिनिधी

वसंतदादा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा करार तब्बल वर्ष उलटल्यानंतर चर्चेत आला आहे. या कराराचा विषय नागपुरात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनौपचारिक गप्पातही रंगल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या कराराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. भाडेकरार बँकेचे पदाधिकारी, संचालकांनी वाचला होता काय, असा सवालही त्यंनी उपस्थित केल्याची चर्चा आहे.  

वसंतदादा कारखाना दहा वर्षे भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा करार झाला आहे. जिल्हा बँक, श्री दत्त इंडिया व वसंतदादा कारखाना व्यवस्थापन यांच्यात त्रिपक्षीय भाडेकरार झाला आहे. या करारानंतर बंद पडलेला कारखाना सुरू झाला. ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना त्यांची प्रलंबित असलेली काही देणी मिळाली. दत्त इंडियाने कारखान्याचा एक गळीत हंगाम पूर्ण केला आहे. करारास एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर आता करारातील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. 

बँकेच्या चार्टर्ड अकौंटंट यांनी भाडेकरारातील त्रुटी नुकतेच संचालक मंडळाच्या बैठकीत मांडल्या. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यापर्यंतही करारातील त्रुटींची माहिती पोहोचली आहे. भाडेकरू दत्त इंडियाने डिपॉझिट  म्हणून ठेवलेल्या 60 कोटी रुपयांवर वार्षिक 4.80 कोटी रुपये बँकेला व्याज मिळाले असते. बँकेने या 60 कोटी रुपयांमधील 30 कोटी रुपये दत्त इंडिया व कारखान्याला शेतकरी, कामागारांची देणी भागविण्यासाठी बिनव्याजी वापरायला दिले. हे 30 कोटी रुपये ठेव स्वरुपात असते तर त्याचे व्याज बँकेला मिळाले असते.

तेवढे नुकसान बँकेचे झाले असल्याकडे लक्ष वेधले जात आहे. बँकेने भाडेकरू दत्त इंडियाकडून 60 कोटी रुपये बिनव्याजी जमा करून घेतले असल्याने  भाडेकरूने प्रती गळीत हंगामात 2 लाख टनापर्यंत विनाभाडे गाळप करायचे आहे. मात्र डिपॉझिटमधील 30 कोटी रुपये ‘दत्त इंडिया व कारखान्याला’ देऊन बँकेने स्वत:च्या हिताकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा जिल्हा बँक वर्तुळात सुरू आहे.या कराराची चर्चा आता प्रदेशस्तरावरही सुरू आहे.  तो आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. नागपूर येथे राष्ट्रवादी नेत्यांच्या अनौपचारिक गप्पात कारखान्याचा भाडेकरारावर चर्चेचा ठरला. करारातील तरतुदी आणि त्रुटींवरून आश्‍चर्य व्यक्त केल्याची चर्चा आहे.