होमपेज › Sangli › पवार गट शिवसेनेत; स्वाभिमानीला जय महाराष्ट्र 

पवार गट शिवसेनेत; स्वाभिमानीला जय महाराष्ट्र 

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 10:10PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेतील भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीला मनपा निवडणुकीत रोखण्यासाठी स्वाभिमानी विकास आघाडीला आम्ही जय महाराष्ट्र करणार आहोत. आता  शिवसेनेतूनच एकसंधपणे लढणार आहोत, असे नगरसेवक गौतम पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.  माजी आमदार संभाजी पवार गटाच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. युवानेते पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा गट शिवसेनेतर्फे एकसंधपणे लढून मनपावर भगवा झेंडा फडकवेल. यासाठी समविचारी पक्षांबरोबर आघाडीसाठी प्रयत्नशील आहोत.

ते म्हणाले, स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आरपीआय, मनसे, जनता दलासह विविध पक्ष एकत्र आलो होतो. ड्रेनेज, घरकुल, पाणी योजना, महापालिकेतील कारभारात  भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकऱणांचा आम्ही पर्दाफाश केला. यासंदर्भात मुख्यमंत्री, लोकायुक्‍तांपयर्र्ंत लढा उभारला. तसेच न्यायालयातही दाद मागितली. परंतु आगामी निवडणुकीत प्रत्येकाची भूमिका बदलली आहे. 

ते म्हणाले, भाजपच्या मर्यादा वाढल्या आहेत. जनता दल, आरपीआयसह विविध पक्षही वेगळ्या भूमिकेत आहेत. अशावेळी आमचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेतूनच ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्कनेते गजानन कीर्तीकर यांच्यासमवेत बैठक झाली. त्यात त्यांनी पूर्ण ताकद देण्याचे आश्‍वासन दिले आहे. याबाबत जिल्हाप्रमुख, संघटक तसेच नगरसेवक शेखर माने यांच्यासोबत बैठकही झाली. त्यानुसार सर्व ताकद एकत्र करून काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखणार आहोत. यामध्ये भाजप सोबत आल्यास त्यांच्याशीही युती करू. 

विशाल पाटील यांचेही स्वागत करू

गौतम पवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचा भ्रष्ट कारभार आणि कारभार्‍यांबद्दल काँग्रेसचे युवानेते विशाल पाटील यांनी तोफ डागली आहे.  गेल्या पाच वर्षांतही काँग्रेसमधीलच काहीजण राष्ट्रवादी-काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला चाप लावण्यासाठी आमच्याबरोबर होते. मग विशाल पाटील यांना तुम्ही बरोबर घेणार का? असे विचारताच पवार म्हणाले, ते जर शिवसेनेत येऊन या भ्रष्ट कारभार्‍यांविरुद्ध लढायला तयार असतील तर त्यांचेही स्वागतच करू.