होमपेज › Sangli › खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 31 2017 12:14AM

बुकमार्क करा
सांगली : वार्ताहर

नागाव-निमणी (ता. तासगाव) येथे फिर्याद मागे घेण्यास नकार दिल्याने रमेश मारूती पवार याचा खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिष्ट यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्‍त जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. 

चेतन ऊर्फ बुलट्या दुर्ग्या पवार (वय 27), सुनील झुंबर्‍या काळे ऊर्फ बापू अशोक काळे (वय 40) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. कारकुन्या आरगड्या पवार, अतिष येडग्या काळे हे संशयित गुन्हा घडल्यापासून फरारी आहेत. खुनाच्या एक महिना आधी या चौघांनी रमेश पवार यांची  झोपडी पेटविली होती. याबाबत पवार यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ती फिर्याद मागे घेण्यासाठी चौघांनी पवार याच्याकडे लकडा लावला होता. तो फिर्याद मागे घेत नसल्याने चौघांनी त्याचा खून करण्याचा कट रचला. दि. 24 जून 2016 रोजी सकाळी अकराच्या सुमारास चौघांनी रमेश पवारला घरातून ओढत बाहेर आणले. त्यावेळी रमेशची आई रंजना, मारुती पवार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चौघांनी त्यांना मारहाण करत बाजूला केले. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या कुर्‍हाड, चाकू, कुकरीने रमेशच्या डोक्यात, पोटावर, पाठीवर अनेक वार केले. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी रमेशची आई रंजना पवारने पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती तर दोघे अद्याप फरारी आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. रमेशची आई रंजना यांची प्रत्यक्षदर्शी साक्ष तसेच तुरचीचे सरपंच राजाराम विष्णू पाटील, पंच गणेश वसंत पाटील, डॉ. जयश्री कांबळे, तपास अधिकारी प्रवीण शिंदे, पोलिस निरीक्षक अशोक भवड यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.