Thu, Jul 18, 2019 00:46होमपेज › Sangli › सावळज आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल

सावळज आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 8:35PMतासगाव : प्रतिनिधी  

तालुक्याच्या पूर्वेकडील 9 गावांतील 33 हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी असलेले सावळज प्राथमिक आरोग्य केंद्र फक्त नावाला शिल्लक राहिले आहे. वैद्यकीय अधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी न राहता स्वत:च्या गावी वास्तव्यास असतात, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. यामुळे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र रुग्णांच्या तक्रारींकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप होत आहे.

सावळज आरोग्य केंद्रातून सावळजसह सिध्देवाडी, अंजनी, नागेवाडी, वडगाव, लोकरेवाडी, डोंगरसोनी, बलगवडे आणि खुजगाव येथील नागरिकांना आरोग्य सोयी- सुविधा दिल्या जातात. येथे मंजूर असलेल्या 15 कर्मचार्‍यांच्या आकृतीबंधापैकी 6 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दोन पैकी एक पद रिक्त आहे, तर निवासस्थानाची सोय असूनही वैद्यकीय अधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी वास्तव्य करत नाहीत. 

सावळज व आसपासच्या खेड्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर सकाळी आणि सायंकाळच्या वेळीच आरोग्य केंद्रात येत असतात. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात. अधिकार्‍यांच्या गैरहजेरीत इतर कर्मचारीसुद्धा घर गाठतात. 

सायंकाळनंतर एखादा परिचारक किंवा परिचारिका सोडली तर आरोग्य केंद्र सुने पडलेले असते. यावेळी रुग्ण आल्यास त्यांना दवाखाना बंद झाला असल्याचे सांगून दुसर्‍या दिवशी येण्यास सांगितले जाते. यामुळे परिस्थिती असो अथवा नसो रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत असल्याचे चित्र आहे.