Mon, Jun 17, 2019 04:54होमपेज › Sangli › डॉ. कदम यांच्या निधनाने जिल्ह्याचे वैभव हरपले

डॉ. कदम यांच्या निधनाने जिल्ह्याचे वैभव हरपले

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 11:28PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

माजी मंत्री  डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे . त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचे वैभव हरपले आहे, अशी भावपूर्ण आदरांजली सोमवारी रक्षाविसर्जनाच्या वेळी विविध मान्यवरांनी वाहिली.  

डॉ. कदम यांचे रक्षाविसर्जन  भावपूर्ण आणि शोकाकुल वातावरणामध्ये सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडले.  अनेकांना डॉ. कदम यांच्या आठवणींनी गहिवरून आले. डॉ. कदम यांचे शुक्रवारी (दि.9) रोजी मुंबई येथे लीलावती रुग्णालायात निधन झाले होते. शनिवारी तालुक्यातील सोनहिरा कारखाना कार्यस्थळावर लाखोंच्या साक्षीने त्यांचा अंत्यविधी करण्यात आला होता. आज सकाळी दहा वाजता रक्षाविसर्जन  झाले.

यावेळी माजी  केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, संजय जगताप, उमाजी सनमडीकर, नामदेवराव मोहिते, पृथ्वीराज पाटील, लालासाहेब यादव, स्वाती शिंदे, डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह  हजारोंचा जनसागर उपस्थित होता. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, डॉ. कदम यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमदार  अनिलराव बाबर म्हणाले, डॉ. कदम हे खर्‍या अर्थाने एक लोकविद्यापीठ होते. ते लोकविद्यापीठ आज हरपले.आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, दुष्काळी भागाला न्याय देण्याचे काम डॉ. कदम यांनी केले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे  म्हणाले, डॉ. कदम हे सांगली जिल्ह्याचे वैभव होते.

माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, डॉ. कदम यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार रमेश  शेंडगे म्हणाले, डॉ. कदम सर्वसामान्यांच्यादृष्टीने ते मोठे आधारवड होते. माजी आमदार विलासराव शिंदे  म्हणाले, डॉ. कदम हे निर्मळ मनाचे आणि निष्कलंक व्यक्तिमत्व होते. विधायक कामाच्या बाबतीत त्यांनी कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे म्हणाले, डॉ. कदम निरपेक्ष भावाने सर्वांना मदत करीत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, डॉ. कदम यांच्याशी आमचा अनेकदा राजकीय संघर्ष झाला. परंतु निवडणूक झाली, की आम्ही एकत्र यायचो. विकासकामात त्यांनी कधी राजकारण केले नाही. माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले, डॉ.कदम यांच्या जाण्याने गोरगरिबांचे अश्रू पुसणारे नेते हरपले आहेत. माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, देशाला अभिमान वाटावे असे काम डॉ. कदम यांनी आपल्या जीवनात केले आहे. 

लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख म्हणाले, डॉ. कदम यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. हुतात्मा उद्योग समुहाचे प्रमुख वैभव नायकवडी म्हणाले, डॉ. कदम यांच्या निधनाने सामान्य कार्यकर्त्यांची शक्ती हरपली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, डॉ. कदम यांच्या अचानक  जाण्याने सहकार चळवळ पोरकी झाली आहे. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, डॉ. कदम हे दिलदार आणि दिलखुलास असे नेते  होते. भाजपचे नेते राजाराम गरूड म्हणाले, डॉ. कदम हे विरोधकांचीही आपुलकीने विचारपूस करीत.