Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Sangli › काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे निधन

Published On: Mar 09 2018 10:25PM | Last Updated: Mar 10 2018 1:40AMसांगली : प्रतिनिधी

भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम (वय 73) यांचे मुंबईतील लीलावती इस्पितळात शुक्रवारी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. डॉ. कदम यांच्यावर लीलावती इस्पितळात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. कदम यांचे पार्थिव शनिवारी सकाळी साडेसात वाजता पुणे येथे डेक्‍कन जिमखाना परिसरातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. कडेगाव तालुक्यातील वांगी येथे सोनहिरा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेचार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

सांगली जिल्ह्यावर शोककळा

राजकारण, शिक्षण, सहकार अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेल्या या मातब्बर नेत्याच्या निधनाने कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांचे लाखो कार्यकर्ते शोकाकुल झाले आहेत.

प्रकृती बिघडल्याने 3 मार्च रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. लीलावती रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. अधिक उपचारांसाठी त्यांना अमेरिकेला नेण्यात येणार होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. कदम हे गेले दोन महिने आजारी होते. दि. 8 जानेवारीस त्यांचा वाढदिवस मतदारसंघ आणि संपूर्ण जिल्ह्यातही उत्साहात साजरा झाला होता. मात्र, ते स्वतः त्यावेळी प्रकृतीच्या कारणामुळे सांगली जिल्ह्यात येऊ शकलेले नव्हते. गेले पंधरा-वीस दिवस त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावरून सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यामुळे सर्वच क्षेत्रात अत्यंत चिंतेचे वातावरण होते.

सोनियांनी केली विचारपूस

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी शुक्रवारी सकाळी लीलावती इस्पितळात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. डॉ. विश्‍वजित कदम आणि कुटुंबीयांना धीर दिला होता. सायंकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याच्या बातम्या मुंबईतून येत होत्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि आम जनतेलाही थोडा दिलासा वाटत होता. मात्र, रात्री दहाच्या दरम्यान दुःखद बातमी येथे येऊन पोहोचली आणि सांगली शहरासह सगळा जिल्हा शोकमग्‍न झाला.

कर्तृत्वाचा गौरीशंकर

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सोनसळ हे डॉ. कदम यांचे गाव. या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या डॉ. कदम यांनी राजकारण, समाजकारण, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात स्वकर्तृत्वाचे गौरीशंकर उभे केले. अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या पतंगरावांनी मोठ्या खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कार्य

सुरुवातीस काही दिवस त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. मात्र, त्यांच्यासमोर शिक्षण क्षेत्रात मोठे काम करायचे स्वप्न होते. त्यानुसार त्यांनी पुण्यातील सदाशिवपेठेत भारती विद्यापीठाची स्थापना केली. भारती अभिमत विद्यापीठाची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली. या विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी कला, वाणिज्य, शास्त्र अशा परंपरागत महाविद्यालयांबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन अशा व्यावसायिक शिक्षण देणार्‍या अनेक महाविद्यालयांचीही उभारणी केली. भारती विद्यापीठाच्या विविध ज्ञानशाखांत सुमारे 10 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात आणि सुमारे 10 हजार अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी काम करतात.

शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही काम सुरू केले. नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, लोकनेते वसंतदादा पाटील, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची त्यांना संधी मिळाली. सुरुवातीस एस.टी. महामंडळाचे संचालक म्हणून त्यांनी मोठे काम केले. गाव तिथे एस.टी. ही संकल्पना त्यांनी राबवली. पूर्वीच्या भिलवडी-वांगी विधानसभा मतदार संघातून ते विधानसभेत पोहोचले. आमदार म्हणून अतिशय प्रभावी काम केल्यानंतर त्यांच्याकडे पाटबंधारे, शिक्षण अशा खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ अशा योजनांना गती देण्याबरोबरच राज्यातील अनेक सिंचन योजनांची त्यांनी आखणी केली. सार्वजनिक शिक्षणाला अधिक व्यापक स्वरूप दिले. दरम्यान, गरिबीतून मोठा झालेला; पण गरिबी कधीही न विसरलेला माणूस आपल्यातून निघून गेल्याची भावना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केली.

सर्व राजकीय पक्षांत आदराचे स्थान

काँग्रेस पक्षाचे एक जबरदस्त नेते म्हणून त्यांची ओळख होती. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, खजिनदार म्हणून त्यांनी काम केले. काँग्रेस पक्षाचा पश्‍चिम महाराष्ट्रात प्रभाव वाढवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. ते काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असले तरी अन्य सर्व राजकीय पक्षांत त्यांच्याबद्दल अत्यंत आदर होता. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी अनेक नाती जपली होती.    

सलग पंधरा वर्षे मंत्री

सन 1999 पासून सन 2014 पर्यंत त्यांनी तब्बल सलग पंधरा वर्षे   राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. महसूल, उद्योग, सहकार, वन, तसेच मदत आणि पुनर्वसन अशा खात्यांचा कारभार अतिशय समर्थपणे सांभाळला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि ते धडाडीने अंमलात आणले. 

भारती विद्यापीठ आणि दैनिक ‘पुढारी’

भारती विद्यापीठ आणि दैनिक ‘पुढारी’ दोन नाहीत, असे डॉ. पतंगराव कदम नेहमी म्हणायचे. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डॉ. कदम यांचा अकृत्रिम स्नेह  होता. त्याचा पतंगराव नेहमी आवर्जून उल्लेख करायचे.

काँग्रेसजनांचा आधारवड हरपला

कोल्हापूर : माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेसजनांसोबतच सर्वसामान्यांचा आधारवड हरपला आहे. शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य उभे केलेल्या कदम यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही स्वत:चा वेगळा ठसा उमठवला, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

शैक्षणिक क्षेत्रात डॉ. पतंगराव कदम यांनी केलेली क्रांती महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. राजकीय जीवनात ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले; पण इतर पक्षातील नेत्यांशीही त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. सत्ताधारी व विरोधक असा विचार न करता सर्वांबरोबर मैत्रीचे संबंध ठेवत पतंगरावांनी सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास कायम ठेवला. कदम यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेस व मराठा नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक धडाडीचा कार्यकर्ता आणि विकासात्मक मोठे निर्णय घेणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा होती. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना पतंगराव मोठा आधार होते. भविष्यातील राजकारणात त्यांची उणीव जरूर भासणार आहे; पण कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाचा आदर्श घेऊन काँग्रेस भक्‍कम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

पी. एन. पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार

डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड गेला. आधारवड म्हणून तरुण पिढीचे ते आशास्थान होते. मुखात एक आणि पोटात एक असा त्यांचा स्वभाव कधीच नव्हता. त्यांच्या निधनाने माझ्या व्यक्‍तिगत आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  

- आ. सतेज पाटील

सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून पतंगराव कदम महाराष्ट्राला परिचित होते. 1964 ला शैक्षणिक संकुलाची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. ऐन तारुण्यात समाजकार्य सुरू केलेले पतंगराव कदम यांनी शेवटपर्यंत तोच ध्यास ठेवला. तात्यासाहेब कोरे आणि वारणा उद्योग समूह यांच्या माध्यमातून पतंगरावांचे संबंध वारणानगरशी कायम राहिले. वारणानगरच्या खोर्‍यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले.  

- विनय कोरे, माजी मंत्री आणि जनसुराज्य पक्षाचे नेते

ज्येष्ठ नेते डॉ. पतंगरावजी कदम हे अत्यंत मनमिळावू होते. काँग्रेस पक्ष एकसंध ठेवणारे नेतृत्व आज हरपले आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीत डॉ. पतंगराव कदम यांचा मोलाचा वाटा आहे. समाजकारण आणि राजकारण यामध्ये नेहमी रोख-ठोक भूमिका घेणारा रांगडा माणूस म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख होती. समाजाचे हित जपणारा हा नेता दुर्दैवाने काळाच्या पडद्याआड गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे .

- प्रकाश आवाडे, माजी मंत्री

अंत्यदर्शन व अंत्यसंस्कार

मुंबईतून शनिवारी सकाळी 7 वाजता पार्थिव पुणे येथे डेक्‍कन जिमखाना परिसरातील निवासस्थानी धनकवडी (पुणे) येथे भारती विद्यापीठ संकुलात सकाळी 10.30 ते 11.30 पार्थिवाचे अंत्यदर्शन वांगी येथे सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर दुपारी 3 वाजता अंत्यदर्शन व  4.30 वाजता अंत्यसंस्कार