Sat, Apr 20, 2019 16:14होमपेज › Sangli › साहेबांची कर्मभूमी कुंडल झाली पोरकी...

साहेबांची कर्मभूमी कुंडल झाली पोरकी...

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 11 2018 8:10PMकुंडल  :  हणमंत माळी

माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांची जन्मभूमी सोनसळ (ता. कडेगाव)  असली तरी कुंडल येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृहात  राहून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रतिनिधी हायस्कूलमध्ये दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच वसतिगृहात असताना त्यांनी खाल्लेल्या आमटी भाकरीचा उल्लेख अखेरपर्यंत आपल्या भाषणात केला.

या परिसरात आल्यानंतर तरूण पिढीला वसतिगृहातील आमटी भाकरीची व कुंडल या क्रांतीभूमीची नाळ आवर्जून सांगत होते. कुंडल येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शैक्षणिक, राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रात विविध पदे भूषवित ऐतिहासिक कामगिरी केली.   कुंडल ही कर्मभूमी असल्याने या क्रांतीभूमीच्या विकासासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक योजना भान ठेवून आखल्या आणि बेभान होऊन त्या राबविल्या. 

2009 साली त्यांनी वनमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पर्यावरणाचा ढासळता समतोल आणि अस्थिर हवामान यांचा समतोल राखण्यासाठी वनसंपत्तीचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे ओळखून कुंडल या कर्मभूमीत वनअकादमी उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. 5 मे 2012 रोजी वनअकादमीला मान्यता घेत प्रशिक्षण केंद्राचे वनअकादमी या शिखर संस्थेत रूपांतर केले. सुमारे 11 हेक्टर जागेत  वन जमिनीवर वन अकादमी साकारली आहे. तसेच या संस्थेला स्वायतता प्रदान करण्यात आली असून कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी असे नामकरण करण्यात आले आहे. 

येथील ओसाड माळ आता वनविद्येचे माहेरघर झाले आहे. या अकादमीमुळे तालुकाच नव्हे, तर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर चमकले. देशातील डेहराडून, कोईमतूर, बर्निहाट, हैदराबाद नंतर सांगली जिल्ह्याला वनअकादमीचा मान मिळाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते या अकादमीचे उद्घाटन केले. 

क्रांतीस्तंभ  

देशातील ब्रिटीश राजवट उलथून टाकण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्वातंत्र्यसैनिक तयार झाले. कुंडलमध्ये स्वातंत्र्यसैनिकांची व्यायामशाळा होती. या व्यायामशाळेच्या जागेवर शासनाच्यावतीने क्रांतीस्तंभ उभारण्यात डॉ. कदम यांनी पुढाकार घेतला.

निधीची चिंता तुम्ही करू नका

आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी विविध खात्यांची मंत्रीपदे ताकदीने सांभाळली. सत्ता असताना त्यांनी पलूस - कडेगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. तसेच विरोधी पक्षात असतानाही त्यांनी मतदार संघाच्या विकासात्मक कार्याला निधी कमी पडू दिला नाही. ते सभेत म्हणायचे, सत्ता असो अथवा नसो डॉ. पतंगराव कदम यांच्या फायली कुठेच कधीही थांबल्या नाहीत. तसेच विकासनिधीही कमी पडणार नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील जनतेने निधीची चिंता करू नये.