Wed, May 22, 2019 10:45होमपेज › Sangli › नेत्यांनो, गावबंदीची वेळ का आली?

नेत्यांनो, गावबंदीची वेळ का आली?

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 11:25PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

आपल्या सर्वस्वाचा त्याग करून कोयना धरणाची निर्मिती करणार्‍या भुमिपुत्र तथा प्रकल्पग्रस्तांना तब्बल साठ वर्षांनंतरही न्याय मिळाला नसल्याने त्यांनी जोपर्यंत त्यांचे प्रश्‍न शंभर टक्के निकाली निघत नाहीत तोपर्यंत त्या गावात कोणीही मतदान मागायला यायचे नाही असा जाहीर फतवा काढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मान्यवर नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. तर याला हीच मंडळी सर्वाधिक जबाबदार असल्याने आपल्यावर ही वेळ का आली याचा त्यांनीच विचार करून तातडीने ठोस पावले उचलावीत. अन्यथा हेच प्रकल्पग्रस्त होत्याचे न्हवते करण्याच्या आक्रमक पवित्र्यात पहायला मिळत आहेत. 

कोयना धरण निर्मितीला आता सुमारे साठ वर्षे उलटून गेली. मात्र  आजही या प्रकल्पासाठी आपल्या जमीनी दिलेल्या भुमिपुत्रांचे बहुतांशी प्रश्‍न प्रलंबित आहेत, ही खेदाची न्हवे तर शरमेची बाब आहे. गेल्या महिन्यात तब्बल तेवीस दिवस याच प्रकल्पग्रस्तांनी कोयनानगर येथे  श्रमिक मुक्ती दलाच्या डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन  केले. त्यानंतर शासनाने याची दखल घेऊन बैठक घेतली.

यात हे सर्व प्रश्‍न तातडीने सोडविण्यात येतील, काही मागण्या एका तर उर्वरित सर्व मागण्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी संबंधित अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या साक्षीने दिले. त्यानंतर शासनाच्या या आश्‍वासनांवर तात्पुरता विश्‍वास ठेवत या अंदोलनकर्त्यांनी तात्पुरते हे आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. 
आजवर साठ वर्षे शांत आणि संयमाने घेणार्‍या प्रकल्पग्रस्तांच्या तीन पिढ्यानंतर आता सुशिक्षित व तितक्याच आक्रमक अशा चौथ्या पिढीने यावेळी ही आंदोलनाची मशाल आपल्या हातात घेतली आहे.

आर या पारची लढाई म्हणूनच हे मावळे आता यात उतरल्याने मग त्यांनी एका बाजूला प्रशासनाला तर आता दुसर्‍या बाजुने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनाही चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अश्‍वासनांची पूर्तता होत नाही तोपर्यंत कोणत्याही नेते, पदाधिकारी व उमेदवारांनी येथे कोणत्याच निवडणुकांसाठी गावात मतदान मागायला यायचे नाही. आणि जर आलात तर जाहीर अपमान केला जाईल, असे भलेमोठे बॅनर तथा फलकच गावोगावी लावण्यात आले आहेत. 

या प्रकल्पग्रस्तांची मतदार आकडेवारी ही काही हजारांच्याही पुढे जाते. त्यामुळे मग या तालुक्याचा सार्वत्रिक निकाल फिरविण्याची नक्कीच ताकत या मंडळींत आहे. त्यामुळे होत्याचे न्हवते व न्हवत्याचे होते, असे ही मंडळी करू शकतात याची जाणीव या मान्यवर नेत्यांनी करून घ्यावी. आजवर हे प्रश्‍न सोडवायला व प्रलंबित ठेवायलाही  जबाबदार असणार्‍या याच मंडळीनी आपापली संपूर्ण ताकद लावून हे प्रश्‍न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा त्यांचे काही खरे नाही हेच चित्र या संतप्त प्रकल्पग्रस्तांमधून पहायला मिळत आहे.
 

 

tags : Patan,news,Builders,Koyna, Dam, Bhoomiputra, Justice,