Wed, Jul 17, 2019 08:08होमपेज › Sangli › पन्‍नास कोटींची कामे सापडली कचाट्यात

पन्‍नास कोटींची कामे सापडली कचाट्यात

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 11:35PMसांगली : प्रतिनिधी

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाला आहे. या निवडणुकीमुळे महापालिका क्षेत्रातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सुमारे पन्‍नास कोटींची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहेत. शिवाय सत्तर एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासह अनेक विकासकामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम सत्ताधारी काँग्रेसला रद्द करावे लागणार आहेत. दरम्यान, शुक्रवारची स्थायी समितीची सभाही रद्द करण्यात आली. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ.पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी दि. 28 मे रोजी मतदान होणार आहे. 

या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण जिल्हाभर आचारसंहिता लागू केली आहे. त्याबाबचे पत्र गुरूवारी महापालिकेला मिळाले. आचारसंहितेचा परिणाम महापालिकेच्या विकासकामांवर होणार आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांच्या फाईल मार्गी  लावण्यासाठी नगरसेवकांची  धावपळ  सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निविदा प्रक्रिया झालेली व दरमान्यतेची सुमारे 50 कोटींची विकासकामे आता कचाट्यात सापडली आहेत.

महापालिकेची निवडणूक जून किंवा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मे च्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते.  सध्याची आचारसंहिता 31 मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर लगेच महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प  होणार आहेत. सांगली व कुपवाडकरांना शुध्द व मुबलक पाणी देण्यासाठी  नवीन जलशुध्दीकरण केंद्र माळ बंगला येथे उभारण्यात आले आहे. 

या केंद्राचा लोकार्पण सोहळा व इतर कामांचा शुभारंभ दि. 2 मे रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  खासदार अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र आचारसंहितेमुळे आता तो कार्यक्रम सत्ताधारी काँग्रेसला रद्द करावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाला फॅक्स

पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेला 31 मे पर्यंत कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. या काळातच महापालिकेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला दोन ते अडीच महिने आचारसंहिता लागू शकते. त्याचा परिणाम महापालिकेच्या विकासकामांवर होणार आहे. मनपा क्षेत्रातील विकास ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने महापालिका क्षेत्रातील आचारसंहिता शिथील करावी, अशी मागणी महापौरांनी फॅक्सव्दारे राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Tags : Palus Kdegaon assembly by election, Code of Conduct, municipal corporation,  work, stopped,