Thu, Jul 18, 2019 14:22होमपेज › Sangli › ‘पलूस-कडेगाव’ बिनविरोध; मनपाला दिलासा

‘पलूस-कडेगाव’ बिनविरोध; मनपाला दिलासा

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 12:18AMसांगली : प्रतिनिधी

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. आता जिल्हाभर लागू असलेली आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली सुमारे 50 कोटी रुपयांची विकासकामे महापालिका निवडणुकीपूर्वी मार्गी लागणार आहेत. एप्रिलपासून पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीची  जिल्हाभर आचारसंहिता लागला होता. 

जुलैच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेची निवडणूक  होणार आहे. त्यामुळे मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेची आचारसंहिता लागू होणार  आहे. त्यापूर्वीच पलूस-कडेगावची आचारसंहिता दि. 31 मेअखेर जिल्हाभर  लागू  झाल्याने महापालिकेची कामे ठप्प झाली होती. त्यामुळे सत्ताधारी, विरोधक अडचणीत आले होते.  रस्ते, गटारीसह इतर निविदा प्रक्रियेतील व दरमान्यतेसाठी असलेल्या विकासकामांच्या फाईल थांबल्या होत्या. महापालिकेने माळबंगला येथे उभारलेल्या 70 व 56 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन मेच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले होते. तेही धुळीस मिळाले होते. 

आता पलूस-कडेगावची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आचारसंहिता शिथील होणार आहे. परिणामी याचा सर्वाधिक फायदा महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवकांसह जनतेला होणार आहे. आता महासभा व स्थायी समितीची सभा घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसे झाल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नगरसेवकांना आता आपल्या फाईल मार्गी लावता येणार आहे.  पन्नास कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे नेतेही 33 कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे उद्घाटन व अन्य कामांचा रंभ करणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी विकासकामांचा धडाका उडणार आहे.