Thu, Apr 25, 2019 07:47होमपेज › Sangli › ‘पलूस-कडेगाव’मध्ये पुन्हा राजकीय संघर्ष?

‘पलूस-कडेगाव’मध्ये पुन्हा राजकीय संघर्ष?

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 10:43PMकडेगाव : रजाअली पिरजादे 

पलूस - कडेगाव  विधानसभा मतदारसंघावर  (स्व.) आमदार डॉ. पतंगराव कदम यांचेच वर्चस्व कायम राहिले होते. डॉ. कदम यांच्या निधनामुळे या मतदारसंघात  दि. 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे.  ही पोटनिवडणूक  लढवण्याचे संकेत भाजपने  दिले आहेत. त्यामुळे भाजपकडून कोण मैदानात उतरणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष  आहे.  

पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून (स्व.) डॉ.  कदम यांचे सुपुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.  त्यादृष्टीने   त्यांनी कामाला जोरदारपणे सुरुवात केली आहे. वर्षभरात विधानसभेची पुन्हा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व पक्ष राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत.  डॉ. कदम यांनी या मतदारसंघात चौफेर विकासाची कामे केली आहेत. राज्यात नेहमी हा मतदार संघ त्यांच्या नेतृत्वाखाली एक पाऊल पुढे राहिला आहे. त्यामुळे विरोधकांपुढे प्रत्येक निवडणुकीत मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.

या मतदारसंघातील आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत कदम बंधूंचे  राजकीय वर्चस्व दिसून येते. सन 1978 मध्ये या ठिकाणी माजी आमदार (स्व.) संपतराव चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध जी. डी. (बापू) लाड (भारतीय कम्युनिस्ट पक्ष-भाकप) अशी लढत झाली होती. त्यामध्ये  चव्हाण यांचा विजय झाला होता.त्यावेळी कदम बंधू काँग्रेस बरोबर राहिले होते. 

सन  1980 मध्ये (स्व.) संपतराव चव्हाण विरुद्ध डॉ. पतंगराव कदम अशी लढत रंगली. ती निवडणूक अतिशय चुरशीने झाली होती.  त्यावेळी डॉ. कदम यांच्या अवघ्या 55 ( पोस्टल) मतांनी पराभव झाला होता. सन 1985 मध्येही पुन्हा  चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध डॉ.कदम (अपक्ष) अशी लढत झाली.त्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने डॉ. कदम यांचा विजय झाला होता. डॉ. कदम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कर्तृत्वामुळे  लोकांनी त्यांना भरभरून मते दिली होती. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.

डॉ.  कदम यांच्या या विजयानंतर या विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा अवतरली. त्या कामांची  दखल काँग्रेस पक्षाला  घ्यावी लागली. सन 1990 मध्ये डॉ. कदम यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाकपचे जी. डी. बापू लाड मैदानात  होते. मात्र डॉ.  कदम विजयी झाले.त्यावेळीही डॉ.कदम यांचा मोठ्या मताधिक्क्याने  विजय झाला होता. याच कालावधीत कदम विरुद्ध देशमुख असा राजकीय संघर्ष सुरू  झाला. ज्येष्ठ नेते माजी आमदार (स्व.) संपतराव देशमुख यांनी जिल्हापरिषदेत सभापती म्हणून प्रभावी काम केले.   सन 1995 च्या निवडणुकीत डॉ. कदम विरुद्ध संपतराव देशमुख अशी जोरदार लढत झाली. त्यावेळी  देशमुख विजयी झाले. 

त्यानंतर  देशमुख यांचे निधन झाले. त्यामुळे सन  1996 मध्ये  पोटनिवडणूक झाली. त्यावेळी  सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा असलेले पृथ्वीराज देशमुख आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. कदम अशी लढत झाली.  त्या  लढतीत देशमुख विजयी झाले.

सन 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी  दिली. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून  डॉ.  कदम  आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये  लढत झाली.  डॉ.  कदम यांचा विजय झाला. त्यानंतर राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आले. डॉ. कदम यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी विकासकामांचा धडाका लावला.  सन 2004 मध्ये पुन्हा डॉ. कदम ( काँग्रेस)  आणि  पृथ्वीराज देशमुख (अपक्ष) अशी लढत झाली. त्यावेळी  देशमुख यांचा  मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला.

सन 2009 च्या  निवडणुकीत पुन्हा एकदा  डॉ.  कदम  यांनी विजय मिळवला. सलग पंधरा वर्षे आमदार आणि मंत्री म्हणून  डॉ.  कदम यांनी  विकासकामात आघाडी घेतली. कडेगाव आणि  पलूस या दोन्ही तालुक्यांचा चौफेर विकास केला. याच काळात  डॉ. विश्वजित कदम  यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेऊन लोकांच्या कामांना प्राधान्य दिले. 

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत  मोदी लाटेचा प्रभाव होता.  जिल्ह्यात भाजपचे खासदार, चार आमदार  निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 मध्ये या  मतदारसंघात डॉ.  कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र  डॉ.  कदम यांचाच विजय झाला.

याच कालावधीत विधानपरिषदेच्या सांगली-सातारा जागेसाठी  निवडणूक झाली.तीत  डॉ. कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांचा विजय झाला.  मतदारसंघात दोन आमदार मिळाल्याने विकासाच्या वाटा आणखी सुकर झाल्या. सन 1968 ते 2018  पर्यंत कदम कुटुंबियांनी विकासकामाच्या जोरावर  मतदारसंघामध्ये आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. डॉ.  कदम यांच्या निधनामुळे आता पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून विश्वजित कदम यांना उमेदवारी निश्‍चित आहे.  भाजप, राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच  लक्ष आहे.

Tags : Palus Kadegaon, By election, Kadam-Deshmukh, Group face to face,