Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Sangli › काँग्रेसतर्फे पाकिस्तानचा पुतळादहन

काँग्रेसतर्फे पाकिस्तानचा पुतळादहन

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 11:24PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

कुलभूषण जाधव यांच्या भेटीप्रसंगी पाकिस्तानने त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या हीन वागणूक प्रकरणाचा सांगलीत शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने निषेध केला. यावेळी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे काँग्रेस कमिटीसमोर दहन करण्यात आले. 

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यावेळी बोलताना  म्हणाले, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि कुंकूला  मज्जाव करून जगातील स्त्रियांचाच अवमान केला आहे. आईला मराठी भाषेत न बोलू देता इंग्रजीची सक्‍ती करून मुलगा अन् आईला संवादच करू दिला नाही. तरीही धीरोदत्त मनाने तिने आपल्या पुत्राचा लांबूनच निरोप घेतला. पाकिस्तानच्या या कृत्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

पाटील म्हणाले, एका बाजूला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीबाहेर आल्यावर गाडीत बसण्यापूर्वी जाधव यांच्या मातोश्रीने अत्यंत नम्रपणे तेथील अधिकार्‍यांना हात जोडून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. या त्यांच्या कृत्याने समस्त भारतीयांची मान उंचावली आहे. पण निष्ठूर पाकिस्तानी अधिकार्‍यांनी जणू माणुसकीच गुंडाळून ठेवली.  

यावेळी अजित ढोले, जावेद शेख, भाऊसाहेब पवार, बिपीन कदम, नितीन कुरळपकर, इरफान मुल्ला, सुजाता होदार, शैलेंद्र पिराळे, अण्णासाहेब कोरे, मौला वंटमुरे, मुफित कोळेकर, चंद्रकांत पवार, अल्ताफ कंकनवाडी, आबा फडतरे, आशिष चौधरी, कय्युमभाई पटवेगार, सुहेल बलबंड आदी सहभागी होते.