Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Sangli › पाडव्याला मार्केट फुल्ल; कोट्यवधींची उलाढाल

पाडव्याला मार्केट फुल्ल; कोट्यवधींची उलाढाल

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 18 2018 11:33PMसांगली : प्रतिनिधी

भारतीय परंपरेतील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण शुभ मानला जातो. या दिवशी विविध खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची चांगलीच रेलचेल असते. सांगलीच्या बाजारपेठेत दुचाकी, चार चाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. व्यापार्‍यांसाठी हा पाडवा आनंददायी ठरला. दिवसभरात कोट्यवधीची उलाढाल झाली. 

गेल्या वर्षी नोटा बंदी व जीएसटी मुळे सगळ्यांच समाज घटकांना  फटका बसला होता.  यावेळी मात्र असा कोणताही परिणाम बाजारपेठेवर दिसून आलेला नाही. सकाळपासून विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी विविध दुकानांमध्ये गर्दी केलेली होती. 

पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढी अर्थात पीएनजी तसेच सराफ बाजारात चांगलीच गर्दी होती. पीएनजीचे समीर गाडगीळ म्हणाले, दागिने खरेदीला नेहमीप्रमाणे यावर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला. दागिन्यांमध्ये नवीन व्हरायटी ठेवल्यामुळे याचा फायदा झालेला आहे. जीएसटीचा कोणताही परिणाम खरेदीवर झालेला नाही. चोख सोन्यापेक्षा दागिने खरेदीकडे लोकांचा कल दिसून आला. तसेच गेले आठवडाभर सोन्याचे दर स्थिर असल्यानेही ग्राहकांना त्याचा फायदा झाला. दिवसभरात कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले. 

चौगुले इंडस्ट्रीजचे निलेश पोतदार म्हणाले, या पाडव्याच्या मुहूर्ताला आमच्याकडे जवळपास 153 गाड्यांची विक्रमी डिलेव्हरी झाली. नवीन मॉडेल्स्च्या  गाड्यांना चांगली मागणी होती. तसेच गाड्या खरेदीवर सवलती दिल्यामुळे त्याचाही फायदा झाला. 

बजाज अ‍ॅग्रोचे शेखर बजाज म्हणाले, शासनाने यावेळी शेतकर्‍यांना प्रत्येक ट्रॅक्टर खरेदीमागे सुमारे 95 हजार रुपयांपर्यंत जबरदस्त सबसिडी दिल्यामुळे यावेळी आमच्याकडे पाडव्याला विक्रमी विक्री झाली. 100 ट्रॅक्टर विकले गेले. 

मिलेनियम होंडाचे बिपीन साळसकर म्हणाले, हा गुढीपाडवा व्यापार्‍यांच्यादृष्टीने चांगला गेला. दुचाकी गाड्यांची विक्रमी खरेदी झाली. आम्ही महिलांसाठी गाड्या खरेदीवर पैठणीची स्कीम सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे 1300 गाड्यांचे बुकिंग झाले. 3 कोटीपर्यंतची उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले. 

जे.व्ही. मोटर्सचे शरद जोशी म्हणाले, गाड्यांना मागणी चांगली आहे. यावर्षी आम्ही 50 गाड्यांची डिलव्हरी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्के जास्त उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले.  भगिरथ सुझुकीचे दीपककुमार पाटील म्हणाले, यावर्षी बिझनेस चांगला आहे. आमच्याकडील गाड्यांना चांगली मागणी आहे. 286  गाड्यांचे बुकिंग झाले आहे. 4 कोटीपर्यंत उलाढाल झाली असून, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

श्री इलेक्ट्रॉनिक्सचे सुनील मालू म्हणाले, यावर्षी फ्रीज, कुलर, एससी या वस्तूंना चांगली मागणी आहे. मोबाईललाही चांगले मार्केट आहे. सुमारे 2 ते 3 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले.  शहर व परिसरातील उपनगरात अनेक ठिकाणी घरावर गुढ्या उभारून नव वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.