मिरज : शहर प्रतिनिधी
कर्नाटकातील सिद्धेश्वर महास्वामींनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. मला पुरस्कार घेण्यात रस नसल्याचे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे, अशी माहिती त्यांचे शिष्य व टाकळीतील मल्लिकार्जुन तपोवनचे शिवदेव स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, कर्नाटकातील सिद्धेश्वर महास्वामींनी मागणी केली नसताना त्यांना पद्मश्री पुरस्कार केंद्र शासनाने जाहीर केला; मात्र सिद्धेश्वर महास्वामी कोणताही पुरस्कार स्वीकारत नाहीत. त्यांनी धारवाड विद्यापीठाची 2004 मध्ये डॉक्टरेट पदवी नाकारली आहे. त्यामुळे त्यांनी आता पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. यावेळी गजेंद्र कुल्लोळी, शीतल पाटोळे उपस्थित होते.