Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Sangli › ओव्हरलोड ऊस वाहतूक, खड्डे किती जीव घेणार?

ओव्हरलोड ऊस वाहतूक, खड्डे किती जीव घेणार?

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 9:51PM

बुकमार्क करा

भिलवडी : शीतलनाथ चौगुले

जिल्ह्यात उसाच्या ट्रॉलीखाली सापडून दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे उसाच्या ओव्हरलोड वाहतुकीचा विषय ऐरणीवर आला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग या वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच असे  अपघात होत आहेत, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. 

परवान्यापेक्षा जादा वजन, बेदरकार वेग, मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर लावणे अशा अवस्थेत ऊस वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. जुन्या ट्रॅक्टरना एका ट्रॉलीत सहा तर नवीन ट्रॉलींत आठ म्हणजे एका ट्रॅक्टरला साधारण बारा ते सोळा टन ऊस वाहतूक करण्याचा परवाना आहे. परंतु सध्या 20 ते 22 टन उसाची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. बैलगाड्यांनाही दोन टन वाहतुकीचा परवाना आहे. मात्र यातून अडीच ते तीन टन उसाची वाहतूक केली जाते. त्यामुळे बैल घसरुन पडणे, त्यांना अंपगत्व येणे अथवा गतप्राण होण्याचे प्रकार घडतात. 

सध्या दोन चाके असलेल्या  ट्रॉलीमधून वाहतुकीचा नवा प्रकार सुरू झाला आहे. कारखान्यात थेट वजन काट्यावर जाण्याचा परवाना असल्याने दुचाकी ट्रॉलीतून वाहतूक केली जाते. त्यांना नंबर नसतो.  इन्शुरन्स नसतो. दिवसात जादा खेपा कशा होतील यासाठी अनेक ट्रॅक्टर चालकांची चढाओढ सुरू असते. ओव्हरलोड वाहतूक करणारे, रिफ्लेक्टर न बसविलेले ट्रॅक्टर रस्त्यांवर सर्रास आढळतात. पण त्यांच्यावर आरटीओंकडून कारवाई होत नाही.

रस्त्यांवरील खड्डे हा सर्वात गंभीर विषय आहे. जिल्ह्यातील  सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. लोक आंदोलन करीत आहेत. पण त्यांची दखल बांधकाम खाते घेताना दिसत नाही. साईड पट्ट्या भरलेल्या नसल्याने ट्रॉलीचे एक चाक रस्त्यावरुन खाली येते. त्यामुळे  ट्रॉली पलटी होण्याचे प्रकार घडत आहेत.