Thu, Jul 18, 2019 00:01होमपेज › Sangli › मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ उद्या जिल्हा बंदचे आयोजन

मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ उद्या जिल्हा बंदचे आयोजन

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 11:28PMसांगली : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश सांगलीत येताना न आणल्यास सोमवारी (दि.30) महापालिका क्षेत्र वगळता जिल्हा बंद केला जाईल. महापालिका क्षेत्रात  निदर्शने होतील, असा इशारा मराठा क्रांंती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

दरम्यान, जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी अन्यथा  आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी सतीश साखळकर, राहुल पवार उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले,  काही दिवसांपासून राज्यात आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाज   सरकारकडे सातत्याने मागणी करीत आहे. राज्यात शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले. सरकारने आश्‍वासन देऊनही ती पूर्ण न झाल्याने असंतोष वाढत   आहे.   सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सांगलीत येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगलीत येताना सोबत मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणावा, तो न आणल्यास त्यांच्या निषेधार्थ जिल्हा बंद केला जाईल, महापालिका क्षेत्रात निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मराठा क्रांतीच्यावतीने या ठिकाणी निदर्शने केली जातील. 

ते म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी  मराठा समाजाची दिशाभूल करुन मराठा समाजाचा अपमान कसा होईल, हे पाहिले. मराठा समाज आंदोलनाव्दारे फोटोसाठी स्टंट करीत असल्याचेही बेताल वक्तव्य केले होते. पंढरपूर आषाढी वारीत साप सोडले जाणार  असल्याची अफवा पसरविली.  त्यांनी लक्षात ठेवावे आमची संस्कृती ज्ञानदेव, तुकारामांची आहे. वारीमध्ये आमचे आई-वडील वारीत असताना साप सोडले असते का, याचाच त्यांनी विचार करावा. साप सोडणार्‍या मंडळींची नावे मुख्यमंत्र्यांनीची जाहीर करावीत . महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची जीभ सैल झाली आहे, 2011 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायरीवर बसून आंदोलन केले होते, याचाच चंद्रकांतदादांना विसर पडला  आहे,असे डॉ. पाटील म्हणाले.