होमपेज › Sangli › सांगली, मिरजेतील ६ शाळा बंदचे आदेश

सांगली, मिरजेतील ६ शाळा बंदचे आदेश

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 11:58PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरजेतील सहा अनधिकृत व विनापरवाना सुरू असलेल्या शाळांवर महापालिका शिक्षण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सहा शाळांना तत्काळ बंदच्या नोटिसा बजावल्याचे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांनी सांगितले. 

ते म्हणाले, यामध्ये स्कायलार्क इंग्लिश मीडियम स्कूल, आशादीप स्पेशल स्कूल, सुप्रीम इंग्लिश स्कूल, द बुद्धिस्ट इंटरनॅशनल, द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल-2 (सर्व सांगली) आणि द बुद्धिस्ट इंटरनॅशनल (मिरज) या  सहा शाळांचा समावेश आहे.

बिराजदार म्हणाले, अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास शाळा व्यवस्थापनास एक लाखाचा दंड केला जाईल. त्यानंतरही शाळा सुरू राहिल्यास दररोज दहा हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. ते म्हणाले, बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार राज्य सरकार अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय, प्रमाणपत्रानुसार कोणतेही शैक्षणिक व्यवस्थापन किंवा शाळा चालवता येत नाही. तसे आढळून आल्यास  कायद्यातील कलम 18(5)नुसार कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार संबंधित शाळांना वारंवार आदेश देऊनही त्या अनधिकृतरीत्या चालविल्या जात आहेत. त्यामुळे आता हा कारवाईचा बडगा उगारला आहे. आता या सहा शाळा बंद कराव्याच लागणार आहेत.ते म्हणाले, महापालिका कार्यक्षेत्रातील या शाळा शिक्षण मंडळाने अनधिकृत म्हणून जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तरी या सर्व शाळांमध्ये पालकांनी प्रवेश घेऊ नये, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.