होमपेज › Sangli › महापौरांसह प्रस्थापितांना काँग्रेसमधून विरोध

महापौरांसह प्रस्थापितांना काँग्रेसमधून विरोध

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 11:36PMसांगली : प्रतिनिधी

महापौरांसह अनेक आजी-माजी पदाधिकार्‍यांनी पदांवर ठाण मांडले आहे. आता पक्षश्रेष्ठींनी अशांना बदलून भाकरी पालटावी, असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांतून व्यक्‍त होत आहे. दोन-अडीच वर्षे संधी मिळून प्रस्थापितांनी शहर विकासात काय दिवे लावले, असा जाबही आता दुसर्‍या,तिसर्‍या फळीतील कार्यकर्तेच विचारू लागले आहेत. नव्या कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाला नवी दिशा द्यावी. ज्येष्ठांनी आता प्रचार आणि पक्षबांधणीचे काम करावे , अशी मागणी होत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होत आहे. या नेत्यांनी  आतापर्यंत अनेक दिग्गजांना संधी दिली. त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी केली.  त्यांच्या विजयासाठी कष्ट केले. परंतु दुर्दैवाने शहराच्या विकासात हे सर्वजण अपयशी ठरल्याचा सूर जनतेत आहे. आता तर भाजपचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. काँगे्रेसचे वातावरण चांगले असले, तरी  प्रामुख्याने तेच ते पदाधिकारी आणि नगरसेवकांबद्दल नाराजीचा सूर आहे. पक्षबांधणीतही ते सहभागी होत नाहीत. कार्यकर्त्यांना न्याय देत नाहीत अशी तक्रार आहे.  

प्रभाग 16 हा खणभागामधील  काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या प्रभागात खणभाग, नळभाग, हिराबाग वॉटरवर्क्स, राजवाडा परिसर, डॉ. आंबेडकर स्टेडियम, संजोग कॉलनी, बदाम चौक, हिंदू-मुस्लिम चौक अशा परिसराचा समावेश होते. या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्ग, ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी दोन जागा आरक्षित आहेत. या प्रभागाचे प्रतिनिधीत्व सध्या  महापौर शिकलगार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, नगरसेविका पुष्पलता पाटील व पद्मिनी जाधव करीत आहेत. मात्र जाधव या काँग्रेसमध्ये; तर त्यांचे पती  दिगंबर जाधव शिवसेनेत आहेत. 

या प्रभागात इच्छुकांनी मोठी तयारी केली आहे. सर्वसाधारण गटातून अनेक प्रमुख दावेदार आहेत. ओबीसी गटातून महापौर  शिकलगार व राजेश नाईक यांनी उमेदवारी मागितली आहे.  यामुळे शिकलगार व नाईक यांच्यात  या  जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.  त्यामुळे सर्वसाधारण गटाच्या जागेवर यांना संधी  नको, असाही सूर आहे. पक्षाने केवळ सर्वसाधारण गटातीलच उमेदवार द्यावा, अशी मागणी  सुरू आहे. 

शिकलगार  नगरपालिकेतही होते. त्यांनी स्थायी समिती सभापती व महापौर अशी सर्वोच्च पदे भूषविली आहेत. महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असताना त्यांना महापौरपद दिले गेले आहे.  एक वर्ष मुदत असताना त्यांना अडीच वर्षे संधी दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता उमेदवारी  न घेता पक्षनेते म्हणून प्रचारात सहभागी व्हावे, अशी भावना काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली आहे. असाच सूर अन्य प्रभागातील कार्यकर्तेही व्यक्त करीत आहेत.