Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Sangli › मतांच्या बेरजेचा प्रयत्न, पण झाली वजाबाकी

मतांच्या बेरजेचा प्रयत्न, पण झाली वजाबाकी

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 10:26PMसांगली : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने सन 2013 ची महापालिका निवडणूक स्वबळावर लढवत 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी काँग्रेसबरोबर आघाडी करून मतांची बेरीज करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात वजाबाकीच झाली आहे. राष्ट्रवादीचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत तळ ठोकला तरीही पक्षाला तिसर्‍या स्थानावर  जावे लागले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक आली. त्यामुळे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. सांगली या ‘होमपिच’वर यशाचा झेंडा रोऊन राज्यभर कूच करायची, असा निर्धार केला होता. त्यादृष्टीने जयंत पाटील यांनी या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसबरोबर आघाडी महत्वाची असल्याकडे त्यांनी सुरूवातीपासूनच लक्ष वेधले होते.

काँग्रेसशी आघाडी करण्यातही त्यांनीच मोठा पुढाकार घेतला.  महापालिका निवडणुकीत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीची सत्ता येणार आणि आघाडीत राष्ट्रवादी ‘नंबर वन’ होणार असा कार्यकर्त्यांचा अंदाज होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभा घेऊन प्रचाराचे रान उठवले होते. माजीमंत्री हसन मुश्रीफ  यांनी प्रचार सभा घेतली. जयंत पाटील यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक प्रभागात जनसंवाद बैठक घेतली आणि निवडणुकीतही प्रत्येक प्रभाग सभा, बैठका, पदयात्रांनी पिंजून काढला होता. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र त्याचे रुपांतर यशात होऊ शकले नाही. सन 2013 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 18 उमेदवार विजयी झाले होते.

सन 2018 च्या निवडणुकीत 15 उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसबरोबर आघाडी करून मतांची व जागांची बेरीज करण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला. मात्र प्रत्यक्षात वजाबाकीच झाली आहे.राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक शेडजी मोहिते, दिग्विजय  सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, मनगू सरगर, संगीता हारगे हे विजयी झाले. मात्र इद्रिस नायकवडी, धनपाल खोत या दिग्गजांबरोबरच युवराज गायकवाड, प्रियांका बंंडगर, स्नेहा औंधकर, कांचन भंडारी या नगरसेवकांचा पराभव झाला.

प्रभाग रचना ते झडती.. प्रशासनाचा भाजपकडून वापर: बजाज

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने प्रशासनाचा पुरेपूर वापर करून घेतला. प्रभाग रचनेपासूनच प्रशासनाचा वापर सुरू होता. राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरी रात्री झडती घेणे, कार्यकर्त्यांची अडवणूक करण्याचे बरेच प्रयत्न केले. भाजपने धनशक्तीचाही मोठा वापर केला. शेवटच्या दोन दिवसात भेटवस्तुंचाही वापर झाला आहे. राज्यातील सत्ता आणि धनशक्ती भाजपच्या मदतीला आली.