Wed, Jul 17, 2019 00:21होमपेज › Sangli › यापुढे सामान्य कार्यकर्त्यालाच संधी : जयंत पाटील 

यापुढे सामान्य कार्यकर्त्यालाच संधी : जयंत पाटील 

Published On: May 01 2018 1:27AM | Last Updated: May 01 2018 1:19AMइस्लामपूर : प्रतिनिधी

यापुढे नेत्यांच्या मागे-पुढे करणार्‍या कार्यकर्त्यांना नव्हे तर समाजाच्या तळागाळात जाऊन काम करणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षात संधी दिली जाईल. प्रसंगी वाईटपणा आला तरी चालेल. मात्र जो पक्षहिताचा निर्णय असेल तोच घेतला जाईल. लोकसभा निवडणुकीपर्यंत  भक्कम बांधणी करून पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवू, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

पुणे येथे पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर  आ. पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये गुणी, युवक कार्यकर्त्यांना प्राधान्याने स्थान देऊ. पायाला भिंगरी लावून राज्यातील कानाकोपर्‍यात फिरून पक्षाला बळकटी देऊ. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भक्कम बांधणी करून पक्षाला गतवैभव प्राप्‍त करून देऊ. 

पाटील म्हणाले, यापुढे नेत्यांच्या आजूबाजूला फिरणार्‍या कार्यकर्त्यांना नव्हे; तर तळागाळात काम करणार्‍या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. पदाधिकारी जी नावे सुचवतील त्यांना पदे दिली जातील. गावनिहाय पक्षाच्या बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी ‘वॉर-रूम’ स्थापन केली जाईल. त्यांना थेट दूरध्वनी  करून विचारणा केली जाईल. त्यात जर खोटेपणा आढळला तर शिफारस करणार्‍या कार्यकर्त्यांवर पक्ष कधीही विश्‍वास ठेवणार नाही. पक्षकार्य करताना वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, तो घ्यायला मी तयार आहे. मात्र पक्षाला सक्षम करून शिस्त लावण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू. 

पुढील कार्याची दिशा स्पष्ट  करताना आमदार पाटील म्हणाले, राज्यातील सर्व मतदारसंघातील बुथ कमिट्या येत्या 4 महिन्यात स्थापन करून 2 लाख बुथ कमिटी सदस्यांचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेऊ. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी सकाळी 11 पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई येथील पक्ष कार्यालयात उपस्थित राहून राज्यभरातील पक्ष कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवू.  पक्षाची ताकद कमी आहे, तेथे कार्यकर्त्यांना ताकद देऊ. आ. पाटील म्हणाले, पक्षाचे अनुभवसंपन्न नेतृत्व आणि राष्ट्रवादी पक्षाची असलेली विकासाप्रती बांधिलकी याच गोष्टी आज महाराष्ट्रासाठी आशादायक आहेत.

उत्तमपणे राज्य सांभाळण्याची क्षमता राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाकडे आहे. भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. लोकांना हे सरकार आपले वाटत नाही.  राज्यात बलात्कार, हत्त्या, दरोडे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. सरकार या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी अपयशी ठरले आहे.  भाजपला समर्थ पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला समोर आणू. उत्तम पद्धतीने राज्य सांभाळण्याची क्षमता असणार्‍या व्यक्तींची फौजच राष्ट्रवादीकडे आहे.