Fri, May 24, 2019 20:48होमपेज › Sangli › मुख्यमंत्र्यांच्या बळाने विरोधक होणार आक्रमक?

मुख्यमंत्र्यांच्या बळाने विरोधक होणार आक्रमक?

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 11:33PMइस्लामपूर : अशोक शिंदे      

मुख्यमंत्र्यांनी सलग केलेल्या इस्लामपूर दौर्‍यांमुळे तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात विरोधक आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी ताज्या दौर्‍यात जयंतरावांवर टीकास्त्र सोडल्याने तालुक्यात विरोधकांकडून परिवर्तनाची भाषा अधिक व्यापक  केली जाऊ लागली आहे. 

विधानसभा निवडणुका सलग एकतर्फी जिंकणार्‍या जयंतरावांपुढे आता कडवे आव्हान उभे करण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा कृषि महोत्सवाच्या निमित्ताने ना. सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडीक, वैभव नायकवडी, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विक्रम पाटील, आनंदराव पवार या तालुक्यातील जयंतराव विरोधकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

याच कार्यक्रमात पिढ्यापिढ्या एकाच घरात दिलेल्या सत्तेच्या विरोधात ना. महादेव जानकर यांनी स्पष्ट वक्‍तव्य केले. 1990, 95, 99, 2004, 2009 आणि 2014 अशा सलग 6 विधानसभा निवडणुका जिंकून जयंत पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपले मताधिक्क्य 33 हजार ते 85 हजारांपर्यंत कायम ठेवले आहे. 

या सर्व निवडणुकांत 1990 व 2009 चा काहीसा अपवाद वगळता सर्व निवडणुका एकतर्फी झाल्याचे दिसून आले. या सर्व कालखंडात राजारामबापू उद्योग समुह, पक्ष संघटन, मंत्रीपद, विकासकामे, बेरजेचे राजकारण अशा अनेक घटकांमुळे विरोधकांची डाळ शिजली नाही. आता मात्र इस्लामपूर पालिका निवडणूक, राज्य व केंद्रातील सत्तांतर आणि त्यानंतर पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत  अशा सर्व निवडणुकांत भाजपसह विरोधकांनी राष्ट्रवादीची केलेली दमछाक विरोधकांचा विश्‍वास वाढविणारी आहे. 

पालिकेत सत्तांतर झाल्यापासून विरोधकांच्या आशा उंचावत गेल्या. आता कृषि राज्यमंत्री ना. खोत यांनी कृषि महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या विरोधातील मंडळींना आणखी आक्रमक होण्यासाठी जणू दिशा दिली आहे. 

याआधीच्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ पाहता तालुक्यात   जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक मंडळी होती, पण ती एकत्र येत नाहीत असे चित्र होते. पण ही सर्व मंडळी पालिका निवडणुकीत एकत्र आली अन्  त्यांनी राष्ट्रवादीला हादरा दिला. तसेच मनसुबे आता विरोधकांकडून सुरू आहेत. 

ना. खोत यांच्यासह आमदार  नाईक, स्वतंत्र प्राबल्य असलेला नानासाहेब महाडिक गट, येलूर-पेठ परिसरातून विजयश्री खेचलेले राहुल व सम्राट महाडीक, हुतात्मा समुहाचे नेते वैभव नायकवडी, युवा नेते गौरव नायकवडी, भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील, युवा मोर्चाचे विक्रम पाटील, तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, बोरगाव जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला हादरा दिलेले काँगे्रसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, वैभव शिंदे अशी अनेक मंडळी आता आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. इकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची भूमिकादेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.