Wed, Nov 13, 2019 12:42होमपेज › Sangli › कस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट

कस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 06 2018 12:42AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

रायगड हे माझे प्रेरणास्थान आहे. ही प्रेरणा घेऊनच मी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांची व्यक्तीरेखा साकारून त्यांना न्याय देऊ शकलो. स्वराज्याच्या या राजधानीचे वैभव पुन्हा प्राप्‍त व्हावे, अशी अपेक्षा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व प्रतिराज युथ फाऊंडेशनच्यावतीने येथे सुरू असलेल्या शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलमध्ये शनिवारी झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील संभाजी फेम डॉ. अमोल कोल्हे व पुतळाबाई फेम पल्लवी वैद्य यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अभिनेत्री मयुरी वाघ यांनी ही मुलाखत घेतली. 

डॉ. कोल्हे  यांनी सांगितले की, पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कळतो. पण छत्रपती संभाजीराजे यांचा खरा इतिहास सांगितला गेला नाही, याची मला खंत वाटते. संभाजीराजे यांच्या बलिदानाची ताकद मोठी आहे. ते एक आदर्श योद्धा, आदर्श पुत्र, आदर्श पती होते. त्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा यासाठी या मालिकेची निर्मिती केली. मला छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका साकारायला मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. 

अभिनेत्री पल्‍लवी वैद्य म्हणाली, माझी ही पहिलीच मालिका आहे. या ऐतिहासिक मालिकेत मला पुतळाबाईंची भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. पुतळाबाईंची भूमिका साकारताना दडपण होते. तरीही या व्यक्तीरेखेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, प्रतिराज युथ फाऊंडेशनचे  संस्थापक खंडेराव जाधव, शाल्वी एंटरप्रायझेसचे नितीन पाटील, दै. पुढारीच्या इव्हेंन्ट मॅनेजमेंटचे प्रमुख राहुल शिंगणापूरकर, इस्लामपूर कार्यालयाचे प्रमुख प्रा. अशोक शिंदे यांच्याहस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. प्रतिराज युथ फाऊंडेशनचे सागर जाधव, हमीद लांडगे, सदानंद पाटील आदी उपस्थित होते.

फेस्टिव्हलच्या दुसर्‍या दिवशी ग्राहकांची गर्दी झाली होती. प्रल्हाद विक्रम प्रस्तुत ऑर्केस्ट्रात कलाकारांनी नवी, जुनी हिंदी गाणी आणि ठसकेबाज लावणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात  महिलांसाठी फनी गेमचे आयोजन करण्यात आले होते. 5 विजेत्या महिलांना पार्श्व ड्रेसेसच्यावतीने साड्या भेट देण्यात आल्या. फेीस्टव्हलच्या दुसर्‍या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला. खरेदीसाठी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. आज (रविवारी) मिस व मिसेस कस्तुरी स्पर्धा होणार आहेत. आ. जयंत पाटील व झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील रेणू यांच्याहस्ते बक्ष3स वितरण होणार आहे.