होमपेज › Sangli › मोफत प्रवेशासाठी केवळ खुलेच राहिले दुर्बलांमध्ये

मोफत प्रवेशासाठी केवळ खुलेच राहिले दुर्बलांमध्ये

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 30 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी

बालकांचा मोफत व सक्तीच्या  शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (आरटीई) अंतर्गत खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशासाठी विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, क आणि ड तसेच ओबीसी यांचा समावेश वंचित गटांमध्ये केला आहे. त्यांना आता उत्पन्न मर्यादेची अट नाही. त्यानुसार रिक्त जागांवर दि. 30 मे ते दि. 4 जून पर्यंत नव्याने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. 

‘आरटीई’ अंतर्गत वंचित आणि दुर्बल असे दोन गट आहेत. वंचित गटात अनुसुचित जाती व जमातीच्या बालकांचा समावेश होता. उर्वरीतांचा समावेश दुर्बलांमध्ये होता. त्यांना मोफत प्रवेशासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपये होती. शासनाने नवीन आदेश जारी करून विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, क, ड आणि ओबीसी तसेच एचआयव्ही बाधित व एचआयव्ही प्रभावित बालकांचा समावेश वंचितांमध्ये केला आहे. त्यांना आता उत्पन्नाची अट राहिलेली नाही. केवळ खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांना उत्पन्नाची अट आहे. एक लाख व त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या खुल्या प्रवर्गातील बालकांना मोफत प्रवेशाचा लाभ होणार आहे. दरम्यान आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशाच्या रिक्त जागांवर शासनाने नवीन प्रवेश फेरी राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. या प्रवेशासाठी दि. 29 मे पासून पालकांना अर्ज भरण्याची सोय उपलब्ध केली आहे. 

आरटीई : 25 टक्के मोफत प्रवेश एक दृष्टीक्षेप

25 टक्के मोफत प्रवेशासाठी पात्र शाळा : 231
25 टक्के मोफत प्रवेशासाठी प्रवेश क्षमता : 2301
प्रवेशाच्या पहिल्या राऊंडमध्ये प्राप्त अर्ज : 1125
मोफत प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी : 603
प्रवेश निश्‍चित झालेले विद्यार्थी : 399
25 टक्के मोफत प्रवेशासाठी अद्याप रिक्त प्रवेश : 1902