Mon, Feb 18, 2019 20:16होमपेज › Sangli › आटपाडी तालुक्यात केवळ 40 टक्के पेरणी

आटपाडी तालुक्यात केवळ 40 टक्के पेरणी

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 8:28PMआटपाडी : लतिफ मुलाणी 

आटपाडी तालुक्यात खरिपाची तीन हजार 861 हेक्टर म्हणजे 40 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अद्याप तालुक्यात मान्सून सक्रिय झाला नसल्याचे चित्र आहे. तसेच मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.आटपाडी तालुक्यात दरवर्षीच पर्जन्यमान अत्यल्प असते. चालू वर्षी या भागात जून महिन्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे लक्ष खरीप हंगामाकडे लागले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी मशागतीची कामे उरकून घेऊन खरीप पेरणीच्या तयारीला सुरुवात केली. 

दुष्काळग्रस्त आटपाडी तालुक्यात खरिपाचे मोठे क्षेत्र आहे. यात पश्‍चिम भागातील गावात खरिपाची पिके  घेतली जातात. या भागातील शेतकर्‍यांची खरीप हंगामातील बाजरी, मका ही प्रमुख पिके आहेत. तूर, उडीद, इतर कडधान्ये आदी पिके घेतली जातात. मागील काही वषार्ंपासून वेळेवर पाऊस पडत नसल्याने खरीप पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.सध्या तालुक्यात खरिपाची तीन हजार 861 हेक्टरवर म्हणजे 40.06 क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यात बाजरीची चांगल्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंमामाबाबत चिंता व्यक्त होत आहे. तसेच पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या उर्वरित पेरण्या रखडल्या आहेत. या भागातील शेतकर्‍यांचा टेंभू योजना प्रमुख जलस्त्रोत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले टेंभू योजनेचे आवर्तन बंद झाल्याने कालवे कोरडे पडले आहेत. या पाण्याच्या माध्यमातून दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला होता. तसेच टेंभूपासून वंचित असलेल्या भागात तलाव, विहिरी कोरड्या आहेत. या परिसराला मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.