होमपेज › Sangli › ऑनलाईन विनापरवाना प्रचार बॅन

ऑनलाईन विनापरवाना प्रचार बॅन

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 8:43PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या बेकायदा ऑनलाईन प्रचाराला बॅन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यासंदर्भात  सर्वच वॉटस् अप् ग्रुपचे लॉगिंग तसेच फेसबुक, यु ट्यूब, ट्विटरचे शेअर यांच्यावर सायबर क्राईमचा वॉच राहणार आहे. निवडणूक अधिकारी कक्ष आणि जिल्हा पोलिसप्रमुखांच्या परवानगीविना ऑनलाईन प्रचाराचे प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिका निवडणुकीमध्ये 78 प्रभागांसाठी 451 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्याकडून सर्वच प्रकारे प्रचाराचा धुरळा सुरू आहे. यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून फुकट ऑनलाईन प्रचाराचा धुमाकूळ सुरू आहे. यामध्ये काही पोस्ट या वादग्रस्त आणि भांडणे, तेढ वाढविणारे असतात. प्रसंगी यातून प्रचारापेक्षा अपप्रचार, हाणामारीपर्यंत वाद वाढण्याचे प्रसंग घडत आहेत. यासाठीच निवडणूक आयोगाने आयुक्‍त खेबुडकर यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी काटेकोर नियोजन केले आहे.

कोणत्याही प्रकारे अशा माध्यमातून विनापरवाना प्रचार करता येणार नाही. असा कोणाला प्रचार करावयाचा असेल तर त्यांनी निवडणूक आचारसंहिता कक्षाकडे परवानगीसाठी अर्ज करावा. त्या कक्षामार्फत  खेबुडकर तपासणी करून याची माहिती पोलिस प्रशासनाला कळविणार आहेत. तेथून परवानगी मिळाल्यानंतरच अशा प्रकारे ऑनलाईन प्रचार करता येईल.

गुंडांचे पोस्टर, फोटो वापरण्यास मनाई

आचारसंहितेच्या काटेकोर नियमावलीअंतर्गत कोणत्याही गुन्हेगार, गुंडांचे पोस्टर, जाहिरातपत्रकावर छायाचित्रे वापरून उमेदवारांनी प्रचार करण्यास निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. शहरातील काही आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच काही पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात अशी छायाचित्रे वापरण्याची परवानगी मागितली होती. परंतु निवडणूक कक्षाने त्याला मनाई केली आहे.