Thu, Jul 18, 2019 12:26होमपेज › Sangli › ऑनलाईन लॉटरी सेंटरवर कडेगाव, चिंचणीत छापा

ऑनलाईन लॉटरी सेंटरवर कडेगाव, चिंचणीत छापा

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 11:40PMकडेगाव : शहर प्रतिनिधी

कडेगाव शहर व चिंचणी गावातील  तीन ऑनलाईन लॉटरी (जुगार)  सेंटरवर  जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने छापा टाकला.  11 जणांना अटक केली असून 1 लाख 86 हजारांचा  मुद्देमाल जप्त केला आहे. 

कडेगाव तालुक्यात बेकायदेशीर  ऑनलाईन लॉटरी सेंटरमधून लोकांची लूट होत आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अशी तक्रार  पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.  पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेत  विशेष पथकाला ऑनलाईन जुगार केंद्रांवर कारवाई  करण्याचे आदेश दिले होते.

पथकप्रमुख  उपअधीक्षक  पिंगळे यांनी कडेगाव व चिंचणी येथे एकाच वेळी छापा टाकला. कडेगाव येथे मुख्य पेठेत असणार्‍या आदर्श लॉटरी सेंटरवर छापा टाकला. आनंदराव रामचंद्र पवार (वय 40, रा.विद्यानगर कडेगाव), सुरेश हिंदुराव जाधव (वय,38) , सिद्धनाथ सदाशिव सूर्यवंशी (वय,38, दोघे रा.हिंगणगाव खुर्द) यांना अटक केली. 10 हजार 450 रुपये  रोख व 54 हजार 810 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

कराड- विटा रस्त्यावरील गोल्डन लॉटरी सेंटरवर कारवाईत नितीन जयसिंग चौगुले (वय 21) आदर्श अनंत पवार (वय 19, दोघे रा.कडेगाव), सुशांत विठ्ठल चव्हाण (वय 26  ,रा.गार्डी, ता.खानापूर), हणमंत रामचंद्र मोरे (वय 44, रा. निमसोड, ता. कडेगाव) यांना अटक केली. त्याच्या कडून 17 हजार 233रूपये रोख आणि 82 हजारांचा मुद्देमाल जप्त  केला. 

चिंचणी येथे सोनहिरा लॉटरी सेंटरवर कारवाई केली. हणमंत नाना हजारे (वय 46) अशोक रूपसिंह चव्हाण (वय 36 ),मोहन पोपट पाटील ( वय 38 ,तिघेही रा.चिंचणी),आयु सखाराम अबदर ( वय 34, रा.सोनसळ, ता.कडेगाव )  यांना अटक केली. अडीच हजार रुपये रोख आणि 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या तीन ठिकाणच्या कारवाईत संगणक संच, मोबाईल, प्रिंटर असे साहित्य जप्त करण्यात आले.         

कारवाईत   जयसिंगपूरचे पोलिस उपनिरीक्षक  पुनम रूगे,इचलकरंजीचे पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी, हवालदार भांगरे कोळी, बांडे ददीकर पाटील यांच्यासह 17 पोलिस व पंचांनी सहभाग घेतला होता. रात्री उशिरा पर्यत  पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.    

दरम्यान या  कारवाईची कोणतीही कल्पना कडेगाव व चिंचणी वांगी पोलिसांना देण्यात आली नव्हती. अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती.