Thu, Jul 18, 2019 10:40होमपेज › Sangli › ऑनलाईन 44, पण प्रत्यक्ष एकही अर्ज नाही

ऑनलाईन 44, पण प्रत्यक्ष एकही अर्ज नाही

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 07 2018 12:07AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार ऑनलाईन 44 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत; परंतु प्रत्यक्षात अनामत भरून  कागदपत्रांची एकानेही  पूर्तता केलेली नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणा उमेदवारांच्या प्रतीक्षेत बसून आहे. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना यांच्याकडून अद्याप उमेदवार निश्‍चितीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सोमवारपासूनच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या रणधुमाळीतील अर्ज भरण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच ऑनलाईन अर्जभरणा होत आहे. त्यासाठी उमेदवारांसह संबंधित यंत्रणेला प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शिवाय, सहा ठिकाणी निवडणूक कार्यालयेही सुरू केली आहेत. गेल्या तीन दिवसांत 44 इच्छुकांनी ऑनलाईन अर्जही दाखल झाले, तरी प्रत्यक्षात एकही अर्ज दाखल झालेला नाही.परंतु या अर्जांसोबत पूर्वी  घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करासह विविध प्रकारच्या विभागांची थकबाकी नसल्याचे दाखले सक्‍तीचे करण्यात आले होते. परंतु इच्छुकांच्या तक्रारीनुसार गुरुवारपासून मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी आयोगाशी बोलून दाखल्यांची संख्या 17 वरून 5 वर आणली होती.  परंतु पुन्हा शौचालय अत्यावश्यक असल्याची सहावी अट वाढली आहे. त्यानुसार आता 6 प्रकारचे दाखले बंधनकारक आहेत.

दरम्यान, सर्वच पक्षांकडून इच्छुकांच्या उमेदवारीबाबत निश्‍चिती झालेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आघाडी, तर भाजपसह अन्य समविचारी पक्षांकडून युतीचा खल सुरूच आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुकांना पक्षादेशासह एबी फॉर्मची प्रतिक्षा आहे. तरीही काहीजणांनी अपक्ष म्हणून ऑनलाईन अर्ज भरले आहेत. पण प्रत्यक्षात एकही अर्ज  प्रतीत ( हार्ड कॉपी)दाखल झालेला नाही. 

मिरजेत एकही अर्ज दाखल नाही

मिरज : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शुक्रवारी तिसर्‍या दिवसाअखेर मिरज विभागीय कार्यालयाकडे एकही अर्ज दाखल झालेला नाही. 

...अन्यथा  पक्ष, उमेदवारांच्या कार्यालयांवर गुन्हे

श्री. खेबुडकर म्हणाले, महापालिका क्षेत्रात राजकीय पक्ष आणि पक्षीय, अपक्ष इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी कार्यालये सुरू केली आहेत. निवडणूक आचारसंहिता नियमावलीनुसार त्यांनी परवानगी घेणे आवश्यक आहे; परंतु परवानगीविना मोठ्या प्रमाणात अशी कार्यालये सुरू झाली आहेत. त्यांनी रीतसर परवाने घ्यावेत; अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. पक्षीय प्रचार सभांसाठी उभारण्यात येणार्‍या स्टेजचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय, परवानगी देण्यात येणार नाहीत.