Sat, May 25, 2019 23:01होमपेज › Sangli › योजना बंदसाठी एका नेत्याचे हीन राजकारण

योजना बंदसाठी एका नेत्याचे हीन राजकारण

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 24 2018 11:53PMसांगली : प्रतिनिधी

म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू व्हावे यासाठी मी खासदारकीही पणाला लावली. ती सुरू होण्यासाठी सर्वपक्षीय आमदार, नेत्यांनी साथ दिली. असे असताना एका नेत्याने मात्र योजना बंदच रहावी म्हणून हीन दर्जाचे राजकारण केले होते, असा गौप्यस्फोट खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. त्यांनी  नेत्याचे नाव न घेता स्वपक्षीय नेत्याकडेच निर्देश केला. अशाप्रकारच्या खालच्या स्तरावर राजकारणाची सांगलीची परंपरा नाही, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, पाणी असूनही केवळ वीजबिलाच्या थकबाकीपोटी पिके वाळून जात होती. अर्थात ही थकबाकी फार मोठी नाही. त्यामुळे ती एकदा संपवून योजना सुरू होण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो. जिल्ह्यातील भाजपसहीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनीही योजना सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. आमदार सुमन पाटील यांनीही समर्थन दले. शेतकर्‍यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे यात राजकारण करणे चुकीचे होते. मात्र एका राजकीय नेत्याने माझे प्रयत्न यशस्वी होऊ नयेत म्हणून पडद्यामागून प्रयत्न चालविले होते. त्यांची ही कृष्णकृत्ये अखेर माझ्या समोर आली. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण कधीच सांगली जिल्ह्यात झाले नव्हते. आम्हीसुद्धा राजकारणात असल्या गोष्टी कधीच केल्या नाहीत. ही चुकीची परंपरा कोणीतरी पाडू पाहत आहे, हे गंभीर आहे. निवडणुकीपुरते राजकारण मर्यादित ठेवावे. लोकांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असे मत त्यांनी मांडले. 

.ते म्हणाले , म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मदत केली. यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. त्यामुळे मी ना. महाजन यांच्यासमोरच माझा राजीनामा टाकून बाहेर आलो होतो.  ही माझी नाराजी पक्ष किंवा कोणत्या नेत्यावर नव्हती. पण ज्यांच्या जिवावर खासदार झालो, त्यांच्या  अपेक्षा पूर्ण होत नसतील तर माझ्या पदाचा उपयोग काय? 

खासदार पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन ना. महाजन यांना टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेच्या वीजबिलापोटी पैसे देण्याची सूचना केली. पंधरा कोटी रुपये वर्गही झाले. त्यामुळे वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागला. म्हैसाळचे आर्वन सुरू झाले. यापुढे शेतकर्‍यांना अत्यंत माफक दरातील बिल भरणे सहज शक्य होईल. त्यामुळे शासनाचा निर्णयावर मी समाधानी आहे.  
 

नेता कोण, याबद्दल बोलणार नाही

योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणारा नेता कोण, याबद्दल विचारता त्यांनी नाव सांगणे टाळले. ते म्हणाले, त्यातून पुन्हा राजकारण होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे कोणाचे नाव घेणार नाही. पण त्यांचा निशाणा पक्षातीलच एका नेत्यावर असावा, अशी चर्चा आता रंगली आहे. 

Tags :