होमपेज › Sangli › नैराश्यामुळे देशात दरवर्षी 1 लाख आत्महत्या

नैराश्यामुळे देशात दरवर्षी 1 लाख आत्महत्या

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 23 2018 12:05AMसांगली : प्रतिनिधी

नैराश्यामुळे देशात दरवर्षी 1 लाख लोक आत्महत्या करतात. एखाद्या दहशतवादी हल्ल्यात अथवा युध्दात मरणार्‍यांपेक्षा ही संख्या जादा आहे, अशी धक्कादायक माहिती अंनिसचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोळकर यांनी येथे दिली. समाजातील वाढत्या  मानसिक अस्वास्थामुळेच बुवा-बाबांचे स्तोम वाढत असल्याचेही ते म्हणाले. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट व राजमती सार्वजनिक ग्रंथालय यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत ‘मनाचे आरोग्य सर्वांसाठी’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप शिंदे होते.

ते म्हणाले, मानसिक अनारोग्याबाबत समाजात खूप गैरसमज आहेत. चिंता, नैराश्य, स्क्रिझोफेनिया यासारखे अनेक आजार स्पर्धात्मक जीवनशैली व  बिकट आर्थिक परिस्थितीमुळे वाढू लागले आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे त्याचे उदाहरण  आहे.  देशात  आत्महत्या करणार्‍यांपैकी 60 टक्के लोक 15 ते 35 या वयोगटातील आहेत. ते पुढे म्हणाले, लोकांना यावर उपचार घेण्याचीही लाज वाटते. अनेकजण मांत्रिक, देव-देवस्की करतात. त्यामुळे  बुवा-बाबांचे स्तोम वाढत आहे. योग्यवेळी निदान व उपचार न झाल्यास संबधित व्यक्ती आत्महत्या करते. दैनंदिन  जीवनात  व्देष, मत्सर, मानसिक हिंसाचार या नकारात्मक भावना टाळून अधिकाधिक सकारात्मक विचार केल्यासही मानसिक आरोग्य चांगले राहू शकते. यावेळी प. रा. आर्डे, के.डी. शिंदे, राहुल थोरात, शशिकांत गायकवाड, चंद्रकात वंजाळे, स्वाती वंजाळे उपस्थित होते.

Tags : Sangli, Sangli News, One lakh suicides, per year, due to depression, country