Tue, Apr 23, 2019 00:03होमपेज › Sangli › वांग धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन पूर्ण

वांग धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन पूर्ण

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 11:39PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

वांग धरणग्रस्तांचे आतापर्यंत कडेगाव, खानापूर, खटाव, माण, उरमोडी परिसरात पुनर्वसन होऊन गावठाणे वसली आहेत. 1650 पैकी 1609 खातेदारांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. उर्वरित धरणग्रस्तांचे पुनर्वसन दि.15 जानेवारीपर्यंत होणार आहे. त्यामुळे वांग धरणग्रस्तांचे 100 टक्के पुनर्वसन पूर्ण झाल्याची माहिती श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

डॉ. पाटणकर म्हणाले, वांग धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी कडेगाव, खानापूर तालुक्यात पुरेशा प्रमाणात जमीन संपादन करण्यात आली होती. 1996-97 ला विरोध झाला होता. परंतु धरणग्रस्त व दुष्काळग्रस्तांनी एकत्र येऊन खानापूर, कडगाव गावठाणे वसविण्यात आली. पुनर्वसनाला सहकार्य करण्यात आले. आधी पुनर्वसन या न्यायाने गावठाणे वसली पाहिजेत, ही प्रक्रिया पुढे जात आहे. त्यानुसार वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होऊन दहा गावठाणांचे नियोजन करण्यात आले. 1650 खातेदारांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. त्यानुसार आतापर्यंत 1609 खातेदारांचे पुनर्वसन केले आहे. उर्वरीत खातेदारांचे पुनर्वसन  दि.15 जानेवारीपर्यंत करण्याचा निर्णय अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. ते म्हणाले, सव्वा दोन हजार हेक्टर जमीन वाट्याला आलेली आहे. सरासरी 3 हेक्टर जमीन प्रत्येकाच्या वाट्याला येते. त्यानुसार कडेगाव तालुक्यातील वांग रेठरे (शाळगाव), मेंढे खुर्द (शिवाजीनगर), आदर्शनगर (विहापूर), केकताईनगर (तोंडोली), घोटील (कोतीज). खानापूर तालुक्यातील उमरकांचन (माहुली), उमरकांचन (नेवरी), कांचनपूर (आळसंद), निगडे (बामणी), जिंती (ढवळेश्‍वर कळंबी) आदी ठिकाणी गावठाणे वसविण्यात येणार आहेत. 

गावठाणाबरोबरच नागरी सुविधांचेही हस्तांतरण प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शंभर टक्के पुनर्वसन होणारे वांग हे तिसरे धरण आहे. चित्री, उरमोडी धरणग्रस्तांचेही 100 टक्के पुनर्वसन झालेले आहे.