Mon, Sep 24, 2018 23:14होमपेज › Sangli › जिल्ह्यात एकशे नऊ शिक्षक होणार ‘विस्थापित’

जिल्ह्यात एकशे नऊ शिक्षक होणार ‘विस्थापित’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडील शिक्षक, वरिष्ठ मुख्याध्यापकांच्या रिक्त पदांचे प्रमाण सर्व तालुक्यात समान ठेवले जाणार आहे. रिक्त पदांच्या समानीकरणासाठी 109 शिक्षकांना ‘विस्थापित’ व्हावे लागणार आहे. वाळवा, शिराळा, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील 109 शिक्षकांना जत, आटपाडी, कडेगाव, खानापूर तालक्यात बदलीने जावे लागेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

जिल्ह्यात मराठी, ऊर्दू, कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची 6 हजार 425 पदे मंजूर आहेत. माध्यमनिहाय मंजूर पदे : मराठी माध्यम- उपशिक्षक-4587, वरिष्ठ मुख्याध्यापक- 432, विषय शिक्षक- 926. ऊर्दू माध्यम: उपशिक्षक- 83, वरिष्ठ मुख्याध्यापक- 25, विषय शिक्षक- 49. कन्नड माध्यम: उपशिक्षक- 348, वरिष्ठ मुख्याध्यापक- 33, कन्नड 74. दरम्यान उपशिक्षक, वरिष्ठ मुख्याध्यापक, विषय शिक्षकांची रिक्त पदे 748 आहेत. यामध्ये मराठी माध्यमाची 679, ऊर्दू 27 व कन्नड- 42 पदांचा समावेश आहे. जत, आटपाडी तालुक्यात रिक्त पदांचे प्रमाण जास्त आहे. 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी होणार आहेत. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्हा परिषद शाळांकडील माध्यमनिहाय रिक्त पदे, कार्यरत पदे, रिक्त पदांच्या समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे याची माहिती शिक्षण विभागाने तयार केली आहे. बदल्यासंदर्भातील पोर्टलवर ही माहिती भरली जात आहे.दरम्यान शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरणासाठी जत तालुक्यात 53, आटपाडी तालुक्यात 29, कडेगाव तालुक्यात 12, खानापूर तालुक्यात 15 पदे अन्य तालुक्यातील शिक्षकांमधून  भरली जाणार आहेत. त्यासाठी वाळवा तालुक्यातील 39, मिरज 23, शिराळा 10, पलूस 17, कवठेमहांकाळ 13 आणि तासगाव तालुक्यातील 7 शिक्षकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. 

Tags : Sangli, Sangli news, One hundred and nine, teachers, displaced, district


  •