Thu, Apr 25, 2019 11:26होमपेज › Sangli › तरुणाच्या खूनप्रकरणी एकास अटक

तरुणाच्या खूनप्रकरणी एकास अटक

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 11:54PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील सह्याद्रीनगर येथील सरफराज इराणी (वय 26) याचा पूर्ववैमनस्यातून खोजा कॉलनीत गुप्तीने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित इरफान हैदरी फिरोज हैदरी इराणी (वय 29) हा गेल्या दहा महिन्यांपासून फरार होता. त्याला संजयनगर पोलिसांनी कल्याणमध्ये अटक केली. त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

दि. 20 ऑक्टोबर रोजी रात्री खुनाची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी फिरोज अलिखान इराणी (वय 50),  महाराणी फिरोज इराणी (वय 50), जैनबी हाशमी इराणी (वय 19) आणि मरियन नूरमहंमद इराणी (वय 26, सर्व रा. खोजा कॉलनी) यांना अटक केली होती; मात्र खुनाची घटना घडल्यापासून इरफान पसार झाला होता. इराणी समाजातील काही लोक पूर्वी महिलांच्या गळ्यांतील दागिने हिसडा मारून लंपास करायचे. फिरोज हा समाजातील दागिने चोरणार्‍यांची नावे पोलिसांना सांगतो, असा संशय होता. त्यामुळे त्यांच्यात वरचेवर वाद होत होता. या वादातून फिरोजने इराणी वस्तीतून कुटुंबासह स्थलांतर केले होते. तो खोजा कॉलनीत राहत होता. तरीही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता. 

दि. 20 ऑक्टोबर रोजी इराणी समाजातील निधन झालेल्या एकावर कुपवाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी फिरोज मुलासह तेथे गेला होता. त्यावेळी काहींनी त्याला तू येथे का आला आहेस, अशी विचारणा करीत वाद घातला. त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. 

त्याच दिवशी रात्री मृत सरफराज व इतर लोक जाब विचारण्यासाठी फिरोजच्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला.  वादाचे रूपांतर मारामारीत झाले. त्यातील एकाने सरफराजवर गुप्तीने हल्ला केला. तो वार सरफराजच्या फुफुसाला लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.  

याप्रकरणी सरफराजचा भाऊ महंमद युसूफ इराणी याने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली होती. मात्र घटना घडल्यापासून इरफान फरारी होता. पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांना इरफान कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक कल्याणला पाठवून त्याला अटक केली.