Sat, Nov 17, 2018 03:42



होमपेज › Sangli › गळवेवाडीतील बालिकेच्या खूनप्रकरणी एकाला अटक

गळवेवाडीतील बालिकेच्या खूनप्रकरणी एकाला अटक

Published On: Jul 28 2018 1:40AM | Last Updated: Jul 28 2018 12:33AM



सांगली : प्रतिनिधी

गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. सात महिन्यानंतर शास्त्रीय तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे संशयिताला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. संवेदनशील प्रकरण असल्याने संशयिताचे नाव उघड करू शकत नसल्याचे अधीक्षक शर्मा यांनी यावेळी सांगितले.

दि. 7 जानेवारी रोजी पीडित बालिका घराबाहेर खेळत असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी जगमाई विहीरीत तिचा मृतदेह सापडला होता. तिच्यावर लैंगिक अत्याच्यार करून तिच्याच पँटने तिचा गळा आवळल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत  मुलीच्या आजोबांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी 180 जणांकडे चौकशी करण्यात आली होती. दरम्यान हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी संयमाने याचा तपास गतीने सुरू ठेवला होता. याप्रकरणी सुमारे दहा जणांची पॉलिग्राफ चाचणी, तिघांची लायडिटेक्टर चाचणी, चौघांची ब्रेन मॅपिंग चाचणीही करण्यात आली होती. 

दरम्यान केलेल्या शास्त्रीय चाचण्यांसह परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधीक्षक शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, आटपाडीचे निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी याचा गतीने तपास केला. 

आमिष दाखवून बोलावले

ती मुलगी अंगणात खेळत असताना संशयिताने तिला कशाचे तरी आमिष दाखवून बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर पाशवी अत्याचार केले. नंतर हा प्रकार उघड होऊ नये यासाठी त्याने त्या मुलीच्याच पँटने तिचा गळा आवळून खून केला. नंतर तिचा मृतदेह विहिरीत टाकून दिला होता. 

वर्षापूर्वीही दोन बालिकांवर केले होते अत्याचार

गळवेवाडीतील बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणी  पोलिसांना पुरावे मिळाल्यानंतर संशयिताला ताब्यात घेतले. तपासात त्याने गतवर्षी सप्टेंबरमध्ये परराज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवरही अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र पीडित मुलींचे पालक बाहेरच्या राज्यातून आल्याने त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार दिली नव्हती. त्या दोन्ही घटना दबल्या गेल्याने संशयिताचे धाडस वाढले होते. त्यामुळेच जानेवारीत त्याने या बालिकेचा अत्याचार करून बळी घेतला. त्याने केलेल्या अत्याचार प्रकरणी त्याच्यावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.