Mon, May 27, 2019 07:20होमपेज › Sangli › मनपा निवडणुकीचे सबकुछ ‘ट्र्यू व्होटर’ अ‍ॅपवर 

मनपा निवडणुकीचे सबकुछ ‘ट्र्यू व्होटर’ अ‍ॅपवर 

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 11:47PMसांगली : प्रतिनिधी

मतदार,  इच्छुक उमेदवारांचे  दाखल अर्ज, निवडणूक खर्च,  मतदान ते निकाल  अशी सर्व माहिती  आता ट्र्यू व्होटर अ‍ॅपवर पहावयास मिळणार आहे.  महापालिकेच्या निवडणुकीचा सबकुछ तपशील एका क्‍लिकवर समोर येणार आहे. यासंदर्भात सोमवारी महापालिकेच्या सभागृहात इच्छुक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचार्‍यांना राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी अ‍ॅपचे प्रशिक्षण दिले. निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागले, उपायुक्त अविनाश सणस, कक्ष अधिकारी अतुल जाधव आदि  उपस्थित होते. अ‍ॅपबाबत आयोगाचे अधिकारी मुरलीधर भुथडा यांनी माहिती दिली.

पहिल्या सत्रात महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. तर दुसर्‍या सत्रात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.  भुथडा म्हणाले, याअ‍ॅपद्वारे मतदार व इच्छुक उमेदवारांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या प्रभागाच्या कार्यक्षेत्रामुळे अनेकदा उमेदवाराला सर्व मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. तसेच मतदाराला त्याच्या समस्याही उमेदवारांना सांगता येत नाहीत. त्यामुळे ट्रु व्होटर अ‍ॅपद्वारे इच्छुक उमेदवार सर्व मतदारापर्यंत आपला अजेंडा पोहोचवता येईल. 

मतदार व्हॉईस कॉलद्वारे त्याच्या भागातील समस्या उमेदवारांना सांगू शकतो, अशी व्यवस्था केली आहे. एकाच क्लिकवर प्रभागाची मतदार यादी उपलब्ध होणार आहे. उमेदवाराचा निवडणूक खर्च, आयोगाचे विविध आदेशापासून ते अगदी निकालापर्यंतची सबकुछ माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध असेल. आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार व स्मृती पाटील,  सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील, जनसंपर्क अधिकारी डी. व्ही. हर्षद उपस्थित होते. 

आचारसंहिता भंगावरही अ‍ॅपच्या माध्यमातून ‘वॉच’

भुथडा म्हणाले, महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंग करण्याच्या प्रकारावरही ट्र्यू व्होटर अ‍ॅपद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. यामुळे मतदारांना आमिष दाखविणे, पैसे वाटप अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासही या अ‍ॅपचा वापर होणार आहे.  मतदारांनी या अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाचीही तक्रार करावी. ही तक्रार महापालिका अधिकारी व पोलिस अधिकार्‍यांकडे जाईल. त्यामुळे तातडीने कारवाई करणेही सोयीचे  होणार आहे. एकूणच या अ‍ॅपचा आचारसंहिता भंगावर वॉच असेल.